Bullet Train Tendernama
मुंबई

Mumbai-Ahmedabad Bullet Train : ताशी ‘इतक्या’ किलोमीटर वेगाने धावणार पहिली बुलेट ट्रेन

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर बुलेट ट्रेन प्रकल्पात वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानामुळे आणि बोगद्याच्या डिझाईनमुळे ताशी २५० किलोमीटर वेगाने बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता निर्माण झाल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. प्रकल्पातील समुद्राखालील बोगद्याच्या कामाची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी या प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.

बुलेट ट्रेनच्या कामाला गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये गती आली आहे. मुंबईतील वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा दरम्यान २१ किमी लांबीचा भारतातील पहिला भूमिगत/समुद्राखालील बोगदा बांधण्यात येत आहे. २१ किमी बोगद्याच्या कामांपैकी १६ किमी टनेल बोरिंग मशीनद्वारे आणि उर्वरित ५ किमी एनएटीएमद्वारे करण्यात येत आहे. यामध्ये ठाणे खाडीयेथील ७ किमी पाण्याखालील बोगद्याचा देखील समावेश आहे.

ठाणे खाडीखालील ७ किलोमीटरचा बोगदा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स स्टेशनला जोडेल. हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच बोगदा आहे. समुद्राखालील बोगदा वेगळ्या पद्धतीने डिझाइन करण्यात आला आहे. तो अत्यंत काळजीपूर्वक बांधण्यात येत असल्याचे, वैष्णव यांनी सांगितले. बुलेट ट्रेनसाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानामुळे आणि बोगद्याच्या डिझाईनमुळे ताशी २५० किलोमीटर वेगाने दोन गाड्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पर्यावरण संरक्षणाबरोबरच वायुविजन आणि प्रकाशयोजनेचीही काळजी घेण्यात आली आहे. प्रकल्पाच्या ३४० किलोमीटरच्या बांधकामात चांगली प्रगती झाली आहे, असे ते म्हणाले.