Railway
Railway Tendernama
मुंबई

Railway : कल्याण-मुरबाड रेल्वेला ग्रीन सिग्नल; 1000 कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्‍या महत्त्‍वपूर्ण कल्याण-मुरबाड (Kalyan-Murbad Railway) रेल्वेला आता केंद्र सरकारने मंजुरी दिली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. सुमारे १ हजार कोटींच्या प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाचे काम रखडलेले होते. निवडणुका जवळ येताच राजकीय पक्षांकडून याबाबत घोषणा देखील केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात या कामाला मुहूर्त सापडत नव्हता. अखेर या रेल्वे कामाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे.

कल्याण-मुरबाड रेल्वेच्या प्रत्यक्ष कामाला सप्टेंबरअखेर सुरुवात होईल, असे आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले असल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले आहे. या प्रकल्पाचे टेंडर मंजूर करण्याची कार्यवाही वेगाने करण्याचे आदेश देण्‍यात आले असून, हा केवळ तुमच्या लोकसभा मतदारसंघातीलच नव्‍हे तर माझा महत्त्‍वाचा प्रकल्‍प असल्‍याचेही वैष्णव यांनी स्पष्ट केले.

राज्यात सत्तापालट होताच, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुरबाड रेल्वेमार्गाच्या रखडलेल्या परिस्थितीकडे लक्ष वेधले होते. या मार्गासाठी राज्य सरकारकडून ५० टक्के वाटा उचलण्याची हमी महाविकास आघाडीकडून दिली गेली नसल्याचे निदर्शनास आणले. त्यानंतर राज्य सरकारने युद्धपातळीवर हालचाली करून दुसऱ्या दिवशीच रेल्वे मंत्रालयाला महाराष्ट्र सरकारकडून ५० टक्के खर्चाची हमी घेतली जाणार असल्याचे पत्र पाठविले. त्यामुळे नव्या भाजप-शिवसेनेच्या राजवटीत कल्याण-मुरबाड रेल्वेला गती येणार असल्याचे स्पष्ट झाले होते.