Panvel Municipal Corporation
Panvel Municipal Corporation Tendernama
मुंबई

Panvel : रस्त्यांचा होणार कायापालट; महापालिकेचे रस्त्यांसाठी 156 कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : पनवेल महापालिकेने १५६ कोटी रुपयांच्या रस्ते बांधकामाची कामे हाती घेतली आहेत. रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि डांबरीकरणासाठी ही टेंडर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. कळंबोली, खारघर, कामोठे या वसाहतींबरोबरच पनवेल शहर आणि तोंडरे गावात ही कामे केली जाणार आहेत.

पनवेल महापालिका क्षेत्रात चार महिन्यांपूर्वी महापालिका प्रशासकांनी २३७ कोटी रुपयांची रस्त्यांची विकासकामे सिडको वसाहतींमध्ये हाती घेतली आहेत. या कामांचे कार्यादेश संबंधित ठेकेदारांना देण्यात आले असून येत्या आठवडाभरात रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू होणार आहे. मुख्य रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामानंतर पनवेल महापालिकेने महापालिका क्षेत्र खड्डेमुक्त करण्याचे नियोजन केले होते. दुसऱ्या टप्प्यात पनवेलमधील अंतर्गत रस्त्यांच्या कामांच्या ५६ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला नुकत्याच पार पडलेल्या प्रशासकीय सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली होती.

या मंजुरीनंतर पनवेल पालिकेने १५६ कोटी रुपयांची टेंडर प्रसिद्ध केली आहेत. महापालिका सुमारे ४०० कोटी रुपये रस्त्यांसाठी खर्च करणार असल्याने काही महिन्यांतच सर्वत्र रस्त्यांची कामे सुरू होतील. रस्त्यांबरोबरच महापालिकेने यातील काही रस्त्यांशेजारील पावसाळी पाणी वाहणाऱ्या गटारांची खोली व रुंदीकरणाची कामे हाती घेतली आहेत. खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा, नवीन पनवेल या सिडको वसाहतींमध्ये मागील सहा वर्षांत पनवेल महापालिकेने मोठी कामे हाती घेतली नव्हती. स्वच्छता आणि आरोग्याची सुविधा वगळता रस्त्यांकडे महापालिकेने उशिराने लक्ष केंद्रित केले. सर्वसाधारण सभेत मंजुरीनंतर संबंधित रस्त्यांच्या कामांविषयी टेंडर काढण्यात आली आहेत. टेंडर प्रक्रिया पार पडल्यानंतर ही कामे सुरू होतील. सिडको वसाहतींचा परिसर हस्तांतरणानंतर पहिल्यांदा पनवेल महापालिका रस्त्यांची कामे करीत आहे.