Road work, contractor, workers Tendernama
मुंबई

Mumbai: पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त रस्ते व पुलांची आयआयटीमार्फत तपासणी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): पालघर जिल्ह्यात अतिवृष्ठीमुळे नुकसानग्रस्त भागांचा सखोल तांत्रिक अभ्यास करण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मार्फत स्वतंत्र तांत्रिक अहवाल तयार करण्यात येत असून, त्या अहवालाच्या आधारे भविष्यात अधिक सुरक्षित, टिकाऊ आणि आपत्तीप्रतिरोधक रस्ते व पुलांची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

पालघर जिल्ह्यात २२ ते २४ जुलै २०२६ या कालावधीत झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे सार्वजनिक रस्ते, पूल आणि वाहतूक व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अल्पावधीत महिनाभराच्या सरासरीइतका पाऊस झाल्याने रेल्वे, रस्ते, दूरसंचार सेवा आणि दळणवळण व्यवस्था विस्कळीत झाली होती. या पार्श्वभूमीवर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करून परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

यावेळी मंत्र्यांनी बोईसर–चिंचणी–डहाणू मार्ग, पालघर–सरावली–बोईसर मार्ग, मनोर–मासचण–पालघर मार्ग तसेच पालघर–नरपड मार्ग यांची प्रत्यक्ष पाहणी केली. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांचे भराव वाहून गेले असून काही ठिकाणी जुने पाईप कल्व्हर्ट व पूल कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. काही मार्गांवर २४ तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन अनेक मार्गांवर वाहतूक तात्पुरती पूर्ववत केली आहे.

दौऱ्यानंतर पालघर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांसमवेत सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत पूर, भूस्खलन आणि वादळी वाऱ्यांमुळे बाधित झालेल्या रस्ते व पुलांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे, वाहतूक शक्य तितक्या लवकर सुरळीत करण्याचे तसेच भविष्यात अशा आपत्तींचा परिणाम कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, "अलीकडच्या काळात पावसाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे. पूर्वीप्रमाणे सलग पाऊस न पडता अत्यल्प कालावधीत अतिवृष्टी होत असल्याने रस्ते, पूल आणि शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे भविष्यातील पावसाचा विचार करून अधिक सक्षम, सुरक्षित आणि टिकाऊ पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक आहे."

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची मुंबई येथे बैठक घेऊन आवश्यक दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजनांबाबत स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामांना प्राधान्याने गती दिली जात आहे.

यामध्ये जुन्या पाईप कल्व्हर्टच्या जागी अधिक क्षमतेचे व उंच स्लॅब पूल उभारणे, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहील अशा पद्धतीने रचना करणे, मोठ्या ओढ्यांलगत संरक्षण भिंती उभारणे, दरडप्रवण ठिकाणी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अशा विविध उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे.

यावेळी पालघरचे आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, खासदार हेमंत सावरा, विधान परिषद आमदार निरंजन डावखरे, पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष भरतसिंग राजपूत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.