Vidhan Bhavan Tendernama
मुंबई

Budget Session 2026: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू; विकासकामे, आर्थिक शिस्तीवर भर

पायाभूत सुविधा प्रकल्पांना चालना देणारी १५ विधेयके येणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

टेंडरनामा ब्युरो

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून (ता. २३) सुरू होत असून, ६ मार्च रोजी सादर होणारा अर्थसंकल्प जनसामान्यांना दिलासा देणारा आणि आर्थिक शिस्त राखणारा असेल, असा विश्वास मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला. या अधिवेशनात एकूण १५ विधेयके मांडली जाणार आहेत.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाच्या तयारीत मांडलेले मुद्दे आणि सूचना विचारात घेतल्या जातील. महसुली संतुलन राखताना नागरिकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.

केंद्राच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला कर वाटपातून ९८,३०६ कोटी रुपयांची तरतूद मिळणार असून अतिरिक्त २,००० कोटींची वाढही करण्यात आली आहे. तसेच रेल्वे अर्थसंकल्पात राज्यासाठी २३,००० कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. केंद्राकडून मंजूर करण्यात आलेल्या दोन हायस्पीड कॉरिडॉर प्रकल्पांमुळे राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

दावोस येथे झालेल्या सुमारे ३० लाख कोटींच्या गुंतवणूक करारांबाबत अधिवेशनात सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढविण्यासाठी ‘महाविस्तार’ या ॲपचा राज्यातील सुमारे ३० लाख शेतकरी वापर करत असून हवामान, पीकस्थिती आणि बाजारभाव यांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध होत आहे. या उपक्रमामुळे उत्पादन खर्च २५ ते ४० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.

चार आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्राधान्याने चर्चा केली जाणार असून विविध विकास विषयांवर विधेयके मांडली जाणार आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहात आयोजित चहापान कार्यक्रमास उपमुख्यमंत्री Eknath Shinde, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य आणि विधिमंडळ सदस्य उपस्थित होते.