Mumbai Metro tendernama
मुंबई

Mumbai : MMRDA चा 300 कोटींचा 'तो' प्रकल्प का सापडला वादात? टेंडर वाटपात घोळ?

Bollywood : चित्रपटसृष्टी आणि वांद्रे पश्चिम परिसराचे हे नाते लक्षात घेता चित्रपट सृष्टीचा इतिहास एका वेगळ्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्यासाठी बाॅलीवूड थीम पार्कची संकल्पना पुढे आणली गेली.

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : अंधेरी पश्चिम ते मंडाळे 'मेट्रो २-ब' मार्गिकेतील ३५५ खांबांखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए - MMRDA) बाॅलीवूड थीम पार्क उभारण्याचे काम सुरू आहे. मेट्रो प्रकल्पातील सुशोभीकरणाअंतर्गत ३०० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. पण आता हा प्रकल्प वादात सापडला आहे.

एमएमआरडीएकडून २३.६४३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. ही मार्गिका एस. व्ही. रोडवरून जात असून, या परिसरात, हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखक, निर्माते, गायक राहतात. तर वांद्रे किल्ला, बॅन्ड स्टँडसह अन्य पर्यटनस्थळे आहेत. कलाकारांना पहायलाही येथे नागरिक येतात.

एकूणच चित्रपटसृष्टी आणि वांद्रे पश्चिम परिसराचे हे नाते लक्षात घेता चित्रपट सृष्टीचा इतिहास एका वेगळ्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्यासाठी बाॅलीवूड थीम पार्कची संकल्पना पुढे आणली गेली. ही संकल्पना एमएमआरडीएने स्वीकारत मेट्रो २ ब मार्गिकेवरील ३५५ खांबांखाली बाॅलीवूड थीम पार्कच्या कामास सुरुवात केली आहे. सध्या हे काम वेगात सुरू आहे.

मात्र, काँग्रेसने या प्रकल्पास विरोध दर्शविला आहे. हा प्रकल्प म्हणजे पैशांची उधळपट्टी आहे, या प्रकल्पाच्या टेंडर वाटपात पारदर्शकता नाही, कंत्राटदाराची नियुक्ती करण्यातही घाई करण्यात आली आहे, हा करदात्यांच्या पैशांचा गैरवापर असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या असिफ झकेरिया यांनी या प्रकल्पास विरोध केला आहे. तसे पत्र नुकतेच एमएमआरडीएला पाठविले आहे.

या प्रकल्पाऐवजी खांबांखाली वृक्षारोपणाच्या माध्यमातून सुशोभीकरण करण्याची मागणी त्यांनी केली आहे. झकेरिया यांच्या पत्राबाबत एमएमआरडीएकडून अद्याप कोणताही भूमिका मांडण्यात आलेली नाही.

दरम्यान, बाॅलीवूड थीम पार्कची संकल्पना मांडणाऱ्या अॅड आशिष शेलार यांनी या प्रकल्पात कोणताही गैरव्यवहार नसून टेंडर पूर्णतः पारदर्शक असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक चांगल्या प्रकल्पास काँग्रेसकडून विरोध होतोच, त्यानुसार या प्रकल्पासही ते विरोध करत आहेत. पण मला आशा आहे की एमएमआरडीए योग्य तो निर्णय घेत हा प्रकल्प पुढे नेईल, असेही शेलार यांनी स्पष्ट केले.