मुंबई (Mumbai): छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळला जोडणाऱ्या मेट्रो ८ (Metro 8) मार्गिकेच्या कामासाठी सल्लागार म्हणून काम करण्यासाठी मोनार्क सर्वेयर्स, निप्पाॅन केओईआय, आरआयटीईएस, टाटा कन्स्लटिंग इंजिनीअर्स आणि क्रिसिल या पाच कंपन्यांनी टेंडर (Tender) सादर केल्या आहेत.
या टेंडर्सची छाननी करून महापालिका निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर आर्थिक टेंडर खुल्या करण्यात येणार असून, त्यानंतर सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे.
दरम्यान, सिडकोकडून या प्रकल्पाच्या आराखड्याचे पुनरावलोकलन करून तो अंतिम केल्यानंतर बांधकामासाठीची टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेतील एक मार्गिका म्हणजे मेट्रो ८ मार्गिका.
या मार्गिकेमुळे मुंबई विमानतळ – नवी मुंबई विमानतळ अंतर केवळ ३० मिनिटात पार करता येणार आहे. अंदाजे १५ हजार कोटी रुपयांची ही मार्गिका ३५ किमी लांबीची आहे. ही मार्गिका मुंबई आणि नवी मुंबई अशा दोन महानगरातून जाणार आहे. त्यामुळे या मार्गिकेचे बांधकाम सिडको आणि एमएमआरडीएकडून केले जाणार होते.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ - मानखुर्द दरम्यानच्या १०.१ किमी लांबीच्या मार्गिकेचे बांधकाम एमएमआरडीएकडून केले जाणार होते. तर उर्वरित मार्गिकेची उभारणी सिडकोकडून केली जाणार आहे. या निर्णयानुसार एमएमआरडीएने आणि सिडकोने आराखडा तयार केला होता. असे असताना राज्य सरकारने फेब्रुवारी २०२५ मध्ये ही मार्गिका सार्वजनिक - खासगी सहभागातून उभारण्याचा निर्णय घेऊन याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला.
प्रकल्पाच्या अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी सिडकोवर टाकली. ही जबाबदारी आल्यानंतर सिडकोने मेट्रो ८ मार्गिकेच्या आराखड्याचे पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतला आणि सप्टेंबर २०२५ मध्ये या कामासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी टेंडर मागविल्या. सिडकोकडून नुकत्याच तांत्रिक टेंडर खुल्या करण्यात आल्या असून पाच कंपन्यांनी टेंडर सादर केल्या आहेत.
मोनार्क सर्वेयर्स, निप्पाॅन केओईआय, आरआयटीईएस, टाटा कन्स्लटिंग इंजिनीअर्स आणि क्रिसिल या पाच कंपन्यांनी टेंडर सादर केल्या आहेत. या टेंडर्सची छाननी करून आचारसंहिता संपल्यानंतर आर्थिक टेंडर खुल्या करण्यात येणार असून त्यानंतर सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. नियुक्त सल्लागाराने आराखड्याचे पुनरावलोकन केल्यानंतर तो अंतिम करून पुढे मार्गिकेच्या बांधकामासाठी टेंडर प्रक्रिया राबविली जाणार आहे.
टेंडर प्रक्रिया अंतिम करून कंत्राटदाराची नियुक्ती करत त्यानंतर कामाला सुरुवात केली जाणार आहे. या प्रक्रियेसाठी आणखी काही महिने लागणार आहेत. त्यामुळे काम सुरू होण्यासाठी आणि त्यानंतर मुंबई विमानतळ – नवी मुंबई विमानतळ प्रवास मेट्रोद्वारे ३० मिनिटांत करण्यासाठीही काही वर्षे वाट पहावी लागणार आहे. काम सुरू झाल्यानंतर ते पूर्ण होऊन ही मार्गिका सेवेत दाखल होण्यासाठी किमान सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे