construction Tendernama
मुंबई

Mumbai मधील 'त्या' 17 इमारतींच्या पुनर्विकासाचा नारळ लवकरच; 4 कंपन्यांनी भरले टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): अंधेरी पूर्व पूनम नगर येथील पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्विकासाचा नारळ लवकरच फुटणार आहे. म्हाडाने या वसाहतीच्या पुनर्विकासासाठी काढलेल्या टेंडरला चार कंपन्यांनी प्रतिसाद देत टेंडर भरले आहे. या पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत रहिवाशांना 180 चौरस फुटाच्या बदल्यात 450 चौरस फुटाचे घर मिळणार आहे.

अंधेरीची पीएमजीपी वसाहत 27,625 चौ.मी. क्षेत्रफळावर वसलेली आहे. 1990-92 दरम्यान पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत उभारलेल्या या वसाहतीत चारमजली 17 इमारती आहेत.

या वसाहतीमध्ये 942 निवासी व 42 अनिवासी अशा एकूण 984 गाळेधारकांचे वास्तव्य आहे. संरचनात्मक अहवालानुसार या इमारती अत्यंत जीर्णावस्थेत आहेत. पावसाळ्यात येथील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागते.

या वसाहतींचा पुनर्विकास मार्गी लागावा यासाठी शिवसेना आमदार बाळा नर यांनी वारंवार म्हाडा आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. पीएमजीपी वसाहतींचा पुनर्विकास कंत्राटदाराची नेमणूक करून म्हाडाच्या माध्यमातून होणार आहे.

टेक्निकल टेंडर प्रक्रियेनंतर आता म्हाडा अर्जांची छाननी करून कमर्शियल टेंडर खुले करणार आहे. त्यानंतर विकासकाची नेमणूक केली जाईल. हा प्रकल्प पुढील साडेतीन वर्षांत पूर्ण करण्याचा म्हाडाचा संकल्प आहे.