Gokhale Bridge Andheri Tendernama
मुंबई

Mumbai : ...तर जून 2025 पर्यंत कर्नाक पूल वाहतुकीस खुला होणार!

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा कर्नाक पूल जून २०२५ पर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे मुंबई महापालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि'मेलो मार्गाला जोडणारा कर्नाक पूल १५४ वर्षे जुना आहे. प्रकल्पाअंतर्गत ५१६ मेट्रिक टन वजनाची दक्षिण बाजूकडील लोखंडी तुळई (गर्डर) रेल्वे भागावर बसवण्‍याचे काम पूर्ण झाले आहे. आता, दुसऱ्या बाजूच्या‍ लोखंडी तुळईचे (गर्डर) ४२८ मेट्रिक टन (८३ टक्‍के) सुटे भाग प्रकल्‍पस्‍थळावर दाखल झाले आहेत. तर, उर्वरित सुटे भाग २० डिसेंबरपर्यंत प्रकल्‍पस्‍थळी दाखल होणे अपेक्षित आहे. तुळईच्‍या सुट्या भागांचे जोडकाम, तुळई स्थापित करण्याची प्रक्रिया, पोहोचमार्ग (अॅप्रोच रोड) बांधणी, भार चाचणी (लोड टेस्‍ट) आदी कामकाजाचे सूक्ष्‍म नियोजन करत वेळापत्रक निश्चित करण्‍यात आले आहे. त्‍यानुसार, अपेक्षित कार्यवाही पूर्ण झाल्‍यास नियोजित वेळेत कर्नाक पूल वाहतुकीस खुला करण्‍यासाठी महापालिका प्रयत्‍नशील आहे.

दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. पूल विभागामार्फत हे पुनर्बांधणीचे काम वेगाने सुरू आहे. अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी नुकतेच प्रकल्पस्‍थळास प्रत्‍यक्ष भेट देऊन पूल कामाच्‍या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच, संबंधितांना आवश्‍यक ते निर्देश दिले. प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता (पूल) शहर राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी, कामगार यावेळी उपस्थित होते. यावेळी बांगर म्‍हणाले की, कर्नाक पुलाच्‍या दुसऱ्या बाजूच्‍या लोखंडी तुळई (गर्डर) चे ४२८ मेट्रिक टन (८३ टक्‍के) सुटे भाग प्रकल्‍पस्‍थळावर दाखल झाले आहेत. तर, उर्वरित सुटे भाग २० डिसेंबरपर्यंत प्रकल्‍पस्‍थळी दाखल होणे अपेक्षित आहे. १३ जानेवारी २०२५ पर्यंत तुळईच्‍या सुटे भागांचे जोडकाम करून १४ जानेवारी २०२५ रोजी 'ट्रायल रन' केले जाईल. १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी रेल्‍वे 'ब्लॉक' मिळण्‍याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडे विनंती करण्‍यात आली आहे. उपरोक्‍त कालावधीत रेल्वे 'ब्लॉक' मिळाल्यानंतर १९ जानेवारी २०२५ पर्यंत तुळई स्थापित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्या दृष्टीने महापालिका प्रशासनाकडून मध्य रेल्वेसोबत समन्वय साधण्यात येत आहे.

अभिजीत बांगर पुढे म्‍हणाले की, रेल्‍वे मार्गावर तुळई स्‍थापित करण्‍याची कार्यवाही पूर्ण झाल्‍यानंतर पुढील कामकाजाचे सूक्ष्‍म नियोजन करून टप्‍पेनिहाय किती कालावधी लागेल, याची निश्चिती करण्‍यात आली आहे. त्‍यानुसार, पूर्व आणि पश्चिम दिशेच्‍या पोहोचमार्ग (अॅप्रोच रोड) साठी खांब बांधणीचा (पाईल फौंडेशन) पहिला टप्‍पा १५ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करणे, १७ एप्रिल २०२५ पर्यंत खांब उभारणी पूर्ण करणे, दिनांक ३ मे २०२५ पर्यंत पोहोच रस्‍त्‍यांचे काँक्रिटीकरण आणि १ जून २०२५ रोजी भार चाचणी (लोड टेस्‍ट) करण्‍याचे नियोजन आहे. या नियोजित वेळापत्रकानुसार, अपेक्षित कार्यवाही पूर्ण झाल्‍यास ५ जून २०२५ पर्यंत कर्नाक पूल वाहतुकीस खुला करण्‍यासाठी महापालिका प्रयत्‍नशील आहे. मात्र, त्‍यासाठी १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी मध्‍य रेल्‍वे प्रशासनाने 'ब्लॉक' मंजूर करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. त्‍यादृष्‍टीने मध्य रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्‍यानंतर जसे की, अॅण्‍टी क्रॅश बॅरिअर्स, वीजेचे खांब उभारण्‍याकामी होणारा कालापव्‍यय टाळण्‍यासाठी ही कामे समांतरपणे पूर्ण केली जाणार असल्‍याचे अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.