BMC
BMC Tendernama
मुंबई

Mumbai : बीएमसीचे नालेसफाईसाठी दुसऱ्या टप्प्यात 'इतक्या' कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेने मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला आतापासूनच धडाकेबाज सुरुवात केली आहे. नालेसफाई, मिठी नदीतील गाळ उपसा करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात १५० कोटींहून अधिकची टेंडर गुरुवारी प्रसिद्ध केली आहेत. महापालिकेने गेल्या आठवड्यात शहर, पूर्व व पश्चिम उपनगरातील नाल्यातील गाळ काढण्यासाठी सुमारे ७० कोटींची टेंडर प्रसिद्ध केली आहेत.

पावसाळ्यापूर्वी लहान-मोठ्या नाल्यातील गाळ काढणे, रस्त्यांवरील कल्व्हर्ट साफ करणे, बॉक्स ड्रेन, रोडसाईड ड्रेनमधील गाळ काढणे आदी कामे करण्यासाठी १५० कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे. पूर्व उपनगरासाठी टेंडर काढण्यात आले आहे. त्यात मुलुंडमधील लहान नाल्यांच्या पुनर्बांधणीसाठी १ कोटी ७९ हजार रुपये, कुर्ला प्रीमियर लेन्थ नाला, गौरीशंकर नगर नाला ते रामदेव पीर नाला आदी नाल्यांचे खोलीकरण यासाठी ६ कोटी ४१ लाख रुपये, एम पूर्व येथील देवनार म्युनिसिपल कॉलनी येथील अहिल्याबाई होळकर मार्ग सर्व्हिस रोड, देवनार नाला रुंदीकरण आणि खोलीकरण यासाठी १० कोटी १२ लाख रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे.

वांद्रे पश्चिम येथील जलप्रलय रोखण्यासाठी वांद्रे स्टेशन पश्चिम येथे मस्जिदजवळ कल्व्हर्टचे काम केले जाणार आहे. सांताक्रुझ स्टेशन रोड येथील बॉक्स ड्रेनचे बाधकाम, वांद्रे पूर्व भागातील पर्जन्य जलवाहिन्यांची पुनर्बांधणी, जोगेश्वरी पूर्व येथील नाल्यांचे बांधकाम, बोरिवली पश्चिम येथील जलप्रलय रोखण्यासाठी कल्व्हर्टचे काम करण्यात येणार आहे. चारकोप कांदिवली, मालाडमधील पर्जन्य वाहिन्यांचे बांधकाम तसेच कल्व्हर्टची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू आहे. या कामासाठी सुमारे ५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने गेल्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये शहरातील नालेसफाईवर तब्बल २८० कोटी रुपये खर्च केले आहेत.