मुंबई (Mumbai) : गेल्या १५ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (Mumbai Goa National Highway) काम पूर्ण होण्यासाठी आणखी २ वर्षे लागतील असा अंदाज आहे.
सध्या सुरू असलेली कामे संथगतीने सुरू असून, अनेक पुलांची कामेही अपूर्ण आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी कोकणवासीयांना आणखी काही काळ कळ सोसावी लागणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळपर्यंतच्या रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे; मात्र नागोठणे, कोलाड, पुई, माणगाव येथील प्रमुख पुलांचे काम अद्याप वेग धरू शकलेले नाही. पळस्पे ते इंदापूर हा ८४ किलोमीटरचा रस्ता सर्वांत तापदायक होता. याचे दोन टप्प्यांत विभाजन केल्यानंतर पळस्पे ते कासूपर्यंत काम पूर्ण होत आले आहे; मात्र त्यानंतरचे काम अनेक ठिकाणी ठप्प आहे.
पळस्पेपासून माणगावपर्यंत पूर्ण झालेल्या मार्गाच्या दुभाजकामध्ये शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. काही ठिकाणी दिशादर्शक फलक लावून काम पूर्ण होत असल्याचे दाखवण्यात येत आहे; मात्र वडखळपासून कशेडी खिंडीपर्यंत प्रमुख पुलांचे काम २० टक्केही पूर्ण झाले नसल्याचे दिसून येते.
या उड्डाणपुलांसाठी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करावा लागणार आहे, तर काही पुलांचे काँक्रीटीकरण काढावे लागणार आहे. जुन्या आराखड्यानुसार हे काँक्रीटीकरण झाले असून वाढलेल्या वाहतुकीला ते अडथळ्याचे ठरत आहे. या उड्डाणपुलाच्या कामाला वेळ लागेल, अशी चिन्हे आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम २०१० पासूनच सुरू आहे. ठेकेदारांच्या निष्काळजीमुळे महामार्गाचे काम रखडले आहे. काम पूर्ण होण्यासाठी स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. मार्गामुळे दळणवळणालाही मोठा फटका बसत आहे.
सुरुवातीला मुंबई-गोवा महामार्ग हा 'बीओटी' तत्त्वावर बांधला जाणार होता; मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, या महामार्गासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे; परंतु ठेकेदारांनी पळ काढल्याने महामार्गाचे काम रखडले आहे.
माणगाव बायपासचे काम न केल्याने चेतक कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आचारसंहिता संपल्यामुळे आता बायपासच्या कामासाठी टेंडर काढले जाणार आहे. माणगावच्या दुतर्फा रस्ता तयार करणे गरजेचे आहे. तिथे १०० वॉर्डन्स लावण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले आहे. त्याच्या पुढच्या रस्त्याचे काम लार्सन अँड टुर्बो कंपनीकडे असून बहुतांश काम पूर्ण झाले आहे.
इंदापूरपर्यंत रस्ता मार्चपर्यंत पूर्ण होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या ८४ किलोमीटर मार्गातील १० किलोमीटरचे काम शिल्लक आहे. हे काम प्रगतीपथावर आहे. आमटेम, नागोठणे, कोलाड, पुई आणि पुढे इंदापूर येथील काही टप्प्यांचा समावेश आहे. रस्त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे.
- यशवंत घोटकर, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण