devendra fadnavis Tendernama
मुंबई

Financial Capitol Of India: मुंबई ठरणार जागतिक भांडवलाचे प्रवेशद्वार

आयएमईसी कॉरिडॉरचा पश्चिमेकडील आधारबिंदू बनण्यास मुंबई सज्ज; AI पार्क, डेटा सेंटर क्लस्टर आणि ग्रीन हायड्रोजन प्रकल्पांवर भर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): मुंबई जागतिक भांडवलाचे प्रवेशद्वार बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ‘ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन 2026’ परिषदेत बोलताना त्यांनी मुंबई आयएमईसीचा (India-Middle East-Europe Economic Corridor) पश्चिमेकडील आधारबिंदू बनण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट केले.

मुंबई ठरणार जागतिक गुंतवणुकीचे केंद्र

जागतिकीकरणाच्या नव्या टप्प्यात ‘विश्वासार्ह जागतिकीकरण’ ही संकल्पना पुढे येत असून महाराष्ट्राचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित होत आहे. देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचे 14 ते 15 टक्के योगदान असून औद्योगिक उत्पादनात राज्याचा सुमारे 20 टक्के वाटा आहे. पश्चिमेकडील बंदरांमधून 60 टक्क्यांहून अधिक कंटेनर वाहतूक महाराष्ट्रातून होत असल्यामुळे मुंबई जागतिक व्यापार साखळीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

आयएमईसी कॉरिडॉरमुळे लॉजिस्टिक सामर्थ्य वाढणार

जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि प्रस्तावित वाढवण बंदर यांसारख्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र पश्चिम सागरी पट्ट्यातील प्रमुख लॉजिस्टिक हब म्हणून उदयास येत आहे. भविष्यातील जागतिक व्यापार व्यवस्था कॉरिडॉर-आधारित असणार असून मुंबई आयएमईसीचा पश्चिमेकडील आधारबिंदू बनण्यास सज्ज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

AI, डेटा सेंटर आणि ग्रीन एनर्जीवर भर

कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा गव्हर्नन्स, सेमिकंडक्टर साखळी आणि कौशल्यपूर्ण मानवसंपत्ती या क्षेत्रांवर राज्य शासनाचा विशेष भर आहे. महाराष्ट्रात AI पार्क, डेटा सेंटर क्लस्टर आणि कौशल्य विद्यापीठांची उभारणी सुरू आहे. याशिवाय ग्रीन हायड्रोजन, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि हरित शहरी पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे.

जागतिक ‘डी-रिस्किंग’ प्रक्रियेत भारताची भूमिका महत्त्वाची

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी जागतिक स्तरावर सुरू असलेल्या पुरवठा साखळी विविधीकरण प्रक्रियेत भारत महत्त्वाचा भागीदार ठरत असल्याचे सांगितले. कोविड-19 महामारी आणि जागतिक संघर्षांनंतर व्यापार व उत्पादन व्यवस्थांमध्ये मोठे बदल होत असून भारत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून जागतिक अर्थव्यवस्थेत विश्वासार्ह भागीदार म्हणून पुढे येत आहे, असे ते म्हणाले.