orange gate to marine drive tunnel Tendernama
मुंबई

Mumbai: पूर्व अन् दक्षिण मुंबईची 'कनेक्टिव्हिटी' होणार अधिक वेगवान

MMRDA: ऑरेंज गेट बोगद्याच्या कामाला डिसेंबरमध्ये सुरुवात

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये सध्या आमूलाग्र बदल होत असून, शहराचा चेहरामोहरा बदलणाऱ्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतलेल्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या दुहेरी बोगद्याच्या कामाला आता गती मिळणार आहे. पूर्व मुक्त मार्गावरून दक्षिण मुंबईत येणाऱ्या वाहनांना थेट मरीन ड्राईव्हला जोडणाऱ्या या प्रकल्पांतर्गत भुयारीकरणाचे काम डिसेंबर महिन्यात सुरू करण्याचे नियोजन प्राधिकरणाने केले आहे.

हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अत्यंत क्लिष्ट आणि महत्त्वाचा असल्याने त्याच्या उभारणीची जबाबदारी एल अँड टी या नामांकित कंपनीकडे सोपवण्यात आली आहे. मुंबईच्या दळणवळणात मैलाचा दगड ठरणाऱ्या या विशाल प्रकल्पासाठी अंदाजे ९१५८ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

मुंबईतील वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी एमएमआरडीएने चेंबूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हा १६.८ किलोमीटर लांबीचा पूर्व मुक्त मार्ग २०१३ मध्ये वाहतुकीसाठी खुला केला.

या मार्गामुळे चेंबूर ते सीएसएमटी हे अंतर अवघ्या २० ते २५ मिनिटांत पार करणे शक्य झाले आहे. मात्र, या वेगवान प्रवासानंतर मरीन ड्राईव्ह किंवा चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना ऑरेंज गेट परिसरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आणि पूर्व उपनगरांना दक्षिण मुंबईच्या पश्चिम टोकाशी थेट जोडण्यासाठी एमएमआरडीएने ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह हा ९.२ किलोमीटर लांबीचा भूमिगत दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे पूर्व मुक्त मार्गावरून येणारी वाहने कोणत्याही अडथळ्याविना मरीन ड्राईव्हला पोहोचू शकतील, ज्यामुळे इंधनाची आणि वेळेची मोठी बचत होणार आहे.

या बोगद्याचे काम पूर्ण झाल्यावर तो मुंबई सागरी किनारा मार्गाला (कोस्टल रोड) जोडला जाईल, ज्यामुळे पश्चिम उपनगरांकडे जाणारी वाहतूकही सुसाट होणार आहे.

भुयारीकरणाच्या कामासाठी ऑरेंज गेट येथे जमिनीखाली मोठी विहीर (शाफ्ट) तयार करण्यात आली असून, तेथूनच बोगदा खोदणारे यंत्र जमिनीत उतरवले जाणार आहे. मुंबई सागरी किनारा मार्गाचे काम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या 'मावळा' या महाकाय यंत्राचा वापर यासाठी केला जाणार आहे. या यंत्रात आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यात आले असून, डिसेंबर महिन्यात एका दिशेच्या बोगद्याचे काम सुरू होईल.

तर, दुसऱ्या दिशेच्या बोगद्यासाठी परदेशातून दुसरे यंत्र मागवण्यात येत असून, एप्रिल २०२६ पर्यंत ते कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले असल्याने, प्रशासनाने पूर्ण ताकदीने कामाला सुरुवात केली आहे. या बोगद्यामुळे भविष्यात मुंबईकरांना पूर्व उपनगरातून मरीन ड्राईव्हपर्यंतचा प्रवास विनाअडथळा आणि काही मिनिटांत करणे शक्य होणार आहे.