bridge
bridge Tendernama
मुंबई

Mumbai : आता ठाण्यावरून थेट नवी मुंबईत जाणे होणार सोपे, कारण...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ठाण्यावरून थेट नवी मुंबईत जाणे सोपे व्हावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) (MMRDA) कोपरी ते पाटणी हा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी एमएमआरडीएने टेंडर प्रसिद्ध केले आहे. हा पूल तयार झाल्यानंतर ठाणे ते नवी मुंबई प्रवास जलद होणार आहे.

ठाण्यातून नवी मुंबईत जाण्यासाठी विटावा-कोपरीदरम्यान पूल बांधण्याची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून केली जात होती. त्यानुसार राज्य सरकारने एमएमआरडीएवर या पुलाची जबाबदारी टाकली आहे. त्यानंतर एमएमआरडीएने कोपरी ते पटणीदरम्यान पूल बांधण्याचा निर्णय घेत त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.

या पुलाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी एमएमआरडीएकडून टेंडर मागविण्यात आले आहे. हा पूल साधारणपणे ६०० मीटर लांबीचा असेल. तर पुलाला जोडणारा रस्ता साधारणपणे ४०० मीटर लांबीचा असेल. कोपरीच्या विसर्जन घाटापासून या पुलाची सुरुवात होणार आहे. या कामासाठी २३४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आता सविस्तर प्रकल्प अहवालाचे टेंडर येत्या काही दिवसांत अंतिम करण्यात येणार आहे. त्यानंतर सहा महिन्यात अहवाल सादर होण्याची शक्यता आहे. अहवाल सादर झाल्यानंतर पुढे प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामासाठी टेंडर प्रक्रिया राबविली जाईल आणि त्यानंतर कामाला सुरुवात होईल.