mira bhayandar municipal corporation Tendernama
मुंबई

लता मंगेशकर नाट्यगृहाच्या दुरवस्थेवरून महायुतीत जुंपली; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

३९ कोटींचे कलादालन तब्बल १६० कोटींवर कसे गेले?; भाजप आमदार नरेंद्र मेहतांचा मंत्री प्रताप सरनाईक यांना सवाल

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): मिरा-भाईंदर येथील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहाच्या दुरवस्थेवरून महायुतीतील आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. नाट्यगृहातील सुविधा बंद असल्याचा आरोप करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महापालिका प्रशासनावर टीका केली. या आरोपांना भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी जोरदार प्रत्युत्तर देत आरोप सिद्ध करण्याचे थेट आव्हान सरनाईक यांना दिले आहे.

‘३९ कोटी रुपयांचे कलादालन तब्बल १६० कोटी रुपयांवर कसे गेले?’ असा सवाल नरेंद्र मेहता यांनी उपस्थित केला आहे. सुमारे ४० हजार चौरस फुटांच्या कलादालनासाठी एवढा प्रचंड खर्च कसा झाला, याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. लता मंगेशकर नाट्यगृहाच्या दुरवस्थेवरून मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजप सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केल्यानंतर मेहता यांनी हा पलटवार केला आहे.

नरेंद्र मेहता यांच्या आरोपानुसार, मिरा-भाईंदर महानगरपालिकेने या कलादालनासाठी सुरुवातीला सुमारे ३९ कोटी रुपयांचे टेंडर काढले. मात्र, प्रकल्पाचा खर्च वाढत-वाढत तब्बल १६० कोटी रुपयांपर्यंत कसा पोहोचला, असा सवाल त्यांनी केला आहे. ‘एवढ्या रकमेत कलादालनावर चांदीचे पत्रे लावले असते, तरी एवढा खर्च झाला नसता,’ अशा शब्दांत मेहता यांनी प्रकल्पाच्या खर्चावरून निशाणा साधला. तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर हा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

लता मंगेशकर नाट्यगृहाच्या दुरवस्थेवरून एक दिवसापूर्वी मंत्री प्रताप सरनाईक यांनी महापालिका प्रशासन आणि भाजपच्या कारभारावर टीका केली होती. त्यानंतर नरेंद्र मेहता यांनी बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या खर्चाचा मुद्दा पुढे करत सरनाईक यांच्यावर पलटवार केला आहे. नाट्यगृहाच्या दुरवस्थेवरून सुरू झालेला राजकीय सामना आता थेट १६० कोटींच्या कलादालनाच्या खर्चापर्यंत पोहोचला आहे.

नरेंद्र मेहता यांनी केलेले आरोप गंभीर असले तरी या आरोपांवर मंत्री प्रताप सरनाईक तसेच संबंधित प्रशासनाची बाजू अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे मेहता यांच्या आरोपांना सरनाईक काय प्रत्युत्तर देतात आणि कलादालनाच्या वाढलेल्या खर्चाबाबत प्रशासनाकडून काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे मिरा-भाईंदरच्या जनतेचे लक्ष लागले आहे.

Key Points

  • लता मंगेशकर नाट्यगृहाच्या दुरवस्थेवरून महायुतीतील आरोप-प्रत्यारोप

  • मंत्री प्रताप सरनाईक यांची महापालिका प्रशासनावर टीका

  • भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा सरनाईक यांच्यावर पलटवार

  • ३९ कोटींचे कलादालन १६० कोटींवर कसे गेले, असा मेहतांचा सवाल

  • सुमारे ४० हजार चौरस फुटांच्या कलादालनाच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

  • प्रकल्पाच्या वाढलेल्या खर्चाबाबत प्रशासनाकडून स्पष्टीकरणाची मागणी

  • बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर भ्रष्टाचार झाल्याचा मेहतांचा गंभीर आरोप

  • मेहता यांच्या आरोपांवर सरनाईक आणि प्रशासनाची बाजू अद्याप समोर आलेली नाही