ram shinde Tendernama
मुंबई

'तो' पूल वाहून गेलाच कसा? विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदेंनी काय दिले आदेश?

Prof. Ram Shinde : कर्जत तालुक्यातील (जि.अहिल्यानगर) खेड-मानेवाडी ते शिंपोरा रस्त्यावरील पूल गेला वाहून

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कर्जत (Karjat) तालुक्यातील (जि.अहिल्यानगर) खेड-मानेवाडी ते शिंपोरा रस्त्यावरील पूल या भागातील शेतकरी, नागरिक, विद्यार्थी यांना रहदारीसाठी महत्त्वाचा आहे. हा पूल अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याने या भागातील नागरिकांना रहदारीसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. (Ram Shinde News)

या परिसरातील नागरिकांना या मार्गावरून सुरळीत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी हा पूल नव्याने बांधण्याचा प्रस्ताव आठ दिवसांत तत्काळ सादर करावा, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन, मुंबई येथील बैठकीत दिले. सभापती प्रा. शिंदे आणि मंत्री गोरे यांच्या उपस्थितीत विधान भवनातील दालनात पूल उभारण्यासंदर्भात बैठक झाली.

मंत्री गोरे म्हणाले, पूल वाहून गेल्याच्या प्रकरणाची आठ दिवसांत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि आठ दिवसांत नवीन, तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट पूल बांधणीबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात यावा, नव्या पुलास लोकभावनेस अनुसरून ग्रामविकास विभागामार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मौजे खेड-मानेवाडी ते शिंपोरा ता. कर्जत, जि. अहिल्यानगर या रस्त्यावरील नांदणी नदीवरील पूल अवकाळी पाऊस व अतिवृष्टीने २५ मे, २०२५ रोजी वाहून गेला. त्यानंतर ९ जून, २०२५ रोजी सभापती प्रा. शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेबद्दल सभापती प्रा. शिंदे आणि ग्रामविकास मंत्री गोरे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

या पुलाच्या बांधकामाची चौकशी करावी, यासाठी नेमलेल्या समितीने आठ दिवसांत आपला अहवाल सादर करून दोषींवर कारवाई करावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले. लोकभावनेची दखल घेऊन पुलाची उभारणी आता तातडीने होणार असल्याने परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे, असेही सभापती प्रा.शिंदे म्हणाले.

या बैठकीस ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, एम.एम.जी.एस.वाय.चे सचिव सतिश चिखलीकर, सहसचिव के. जी. वळवी, उप सचिव प्रशांत पाटील, तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर आनंद भंडारी, सोलापूर पुनर्वसन विभाग उजनी अधीक्षक अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे भदाणे आदी उपस्थित होते.