मुंबई (Mumbai): राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारने काढले असून, IAS अधिकारी रूबल अग्रवाल यांच्यावर दुहेरी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोकण विभागीय आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरही मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कारभार अगरवाल यांच्याकडेच कायम ठेवण्यात आला आहे. श्वेता सिंघल यांच्या बदलीला स्थगिती दिल्याने फडणवीस सरकारने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुहेरी जबाबदारी
राज्यातील अलीकडील प्रशासकीय बदल्यांमध्ये IAS अधिकारी रूबल अग्रवाल यांना कोकण विभागीय आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले. त्यांनी नुकताच या पदाचा कार्यभार स्वीकारला असतानाच त्यांच्याकडे मुंबई मेट्रोचा अतिरिक्त कारभारही कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
महामुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी IAS श्वेता सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या बदलीला अचानक स्थगिती देण्यात आल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीत मेट्रोचा कारभार रूबल अग्रवाल यांच्याकडेच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अग्रवाल या सध्या दुहेरी जबाबदारी सांभाळत आहेत.
धडाकेबाज अधिकारी
अग्रवाल या भारतीय प्रशासकीय सेवेच्या (IAS) 2008 बॅचच्या अधिकारी असून त्यांनी राज्यातील विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. जळगावच्या जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी केलेले काम विशेष गाजले. त्यानंतर शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर त्यांनी अनेक प्रलंबित प्रकल्पांना गती दिली.
पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करताना त्यांनी कोविड काळात आरोग्य व्यवस्थेचे प्रभावी नियोजन केले. जम्बो कोविड सेंटर उभारणीपासून ते उपचार व्यवस्थेपर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावरही त्यांनी काम केले आहे.
कार्यक्षमतेची कसोटी लागणार
एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तपदावर असताना त्यांनी कुपोषण रोखण्यासाठी आणि महिलांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांच्या कामकाजातील गतिमान शैलीमुळे त्यांना प्रशासनात ‘स्मार्ट आणि स्ट्राँग ऑफिसर’ म्हणून ओळख मिळाली आहे.
मुंबई मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी त्यांची MMRDA मध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता कोकण विभागीय आयुक्तपदासोबतच मेट्रोचा कारभारही सांभाळत असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेची मोठी कसोटी लागणार आहे.