Vedanta
Vedanta Tendernama
मुंबई

महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला पळविले पण सुविधांअभावी 6 कंपन्या..

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : फॉक्सकॉन या परदेशी कंपनीने वेदांता कंपनीसोबत भागीदारी करत भारतात सेमी कंडक्टर निर्मितीचा प्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, मात्र नंतर गुजरातला पळवण्यात आला. आता या प्रकल्पातून फॉक्सकॉनने काढता पाय घेतला आहे. आतापर्यंत सहा कंपन्यांनी येथून पळ काढलेला आहे.

संयुक्त भागीदारीतून आपण बाहेर पडत असल्याचे फॉक्सकॉनने जाहीर केले आहे. फॉक्सकॉन ही तैवानची कंपनी असून सोमवारी त्यांनी भागीदारीतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. रॉयटर्सने याबाबतचे वृत्त दिले असून या दोन्ही कंपन्या एकत्र आल्याने निर्माण झालेल्या कंपनीतून आपले नाव हटवण्याची प्रक्रिया फॉक्सकॉनने सुरू केली आहे. फॉक्सकॉनचा संयुक्त भागीदारीतून निर्माण झालेल्या कंपनीशी आता कोणताही संबंध नसेल असे जाहीर करण्यात आले आहे. या भागीदारीतून बाहेर पडत असलो तरी भारतात सेमी कंडक्टरच्या निर्मितीसाठी आपण नेहमी पुरस्कार करत राहू आणि भविष्यात नव्या स्थानिक भागीदाऱ्या करत राहू असे जाहीर करण्यात आले आहे.

वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला पळवल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. मात्र, गुजरातच्या ढोलेरा येथे पायाभूत सुविधांची वानवा असल्याने तेथून याआधी सुद्धा अनेक मोठ्या प्रकल्पांनी काढता पाय घेतला असल्याने वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पाचीही गुजरातमध्ये कोंडी होणार याची चर्चा आधीपासूनच सुरु होती. पायाभूत सुविधांअभावी ढोलेरातून आतापर्यंत आयएसएमसी डिजिटल, जिओफोन, लॉकहीड मार्टीन कॉर्पोरेशन, एचडीसी, जीएसपीसी या पाच मोठ्या प्रकल्पांनी पळ काढला आहे. केंद्र सरकारच्या अट्टाहासाने वेदांन्ता फॉक्सकॉन प्रकल्पही अडचणीत येण्याची किंवा प्रदीर्घ काळ रखडण्याची शक्यता, उद्योग जगतात आधीपासूनच व्यक्त केली जात होती.

वेदांता कंपनीने तळेगाव व ढोलेरा या दोन्ही स्थळांचा तुलनात्मक अभ्यास केला होता. कंपनीच्या अंतर्गत अहवालानुसार ढोलेरा येथे पाण्याची व कुशल कामगारांची कमतरता, इलेक्ट्रॉनिक्स इकोसिस्टिम नसणे, दुय्यम उत्पादकांची कमतरता व दलदलयुक्त जमीन अशी अनेक कारणे देऊन नापसंती व्यक्त केली होती. महाराष्ट्रातील तळेगाव हीच या प्रकल्पासाठी सुयोग्य जागा होती. या करिता महाराष्ट्राने गुजरातपेक्षा अधिक भांडवली अनुदानासहित अनेक सवलती देऊनही आयत्या वेळी हा प्रकल्प ढोलेरा येथे नेण्याचा निर्णय केवळ केंद्र सरकारच्या दबावाखाली झाला असल्याचा आरोप आहे. १० बिलियन डॉलर गुंतवणुकीच्या सेमीकंडक्टर उत्पादनासाठी देशात वेदांता फॉक्सकॉन सहित तीन कंपन्यांनी अर्ज केला. त्यातील आयएसएमसी डिजिटल (ISMC Digital) ही कंपनी ढोलेराला येणार होती‌. या कंपनीबरोबर गुजरात सरकारचा सामंजस्य करारही झाला होता. मात्र, कंपनीने सुविधा व पाण्याच्या कमतरतेमुळे ढोलेरातून पळ काढला आहे.

जिओफोन हा प्रकल्प ढोलेरा सोडून तिरुपतीला गेला. या अगोदर लॉकहीड मार्टीन कॉर्पोरेशन या कंपनीने सोलार बॅटरी प्रकल्पातून ढोलेरामधून माघार घेतली. त्यानंतर पायाभूत सुविधांअभावी एचडीसी (HDC) प्रकल्पाने ढोलेरा येथून काढता पाय घेतला. यामुळे केंद्र सरकारच्या अट्टाहासाने वेदांन्ता फॉक्सकॉन प्रकल्पही अडचणीत येण्याची किंवा प्रदीर्घ काळ रखडण्याची शक्यता आधीपासूनच व्यक्त केली जात होती. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्यात अनेक अव्यवहार्य प्रकल्प घोषित करुन हजारो करोड पाण्यात घातले, असा आरोप काँग्रेसने केला आहे. गुजरात मध्ये असाच गिफ्ट सिटी प्रकल्प रखडला होता. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र तिथे नेले. गॅसचे साठे मिळाले असे दाखवून जीएसपीसी (GSPC) ला १० हजार कोटीचे रोखे घेण्यास भाग पाडले गेले. पुढे गॅसच नाही हे स्पष्ट झाल्यानंतर कर्जबाजारी झालेल्या या कंपनीला केंद्रात सत्ता आल्यानंतर ओएनजीसीला विकत घेण्यास भाग पाडले गेले. २०१४ पासून केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून महाराष्ट्र आणि मुबईतील प्रकल्प आणि उद्योग पळविण्याची परंपरा कायम असल्याचे दिसून येते. यामागे महाराष्ट्र आणि मुंबईचे महत्व कमी करण्याचा भाजपचा अजेंडा असल्याची टीका काँग्रेस आणि शिवसेनेकडून करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील आठ मोठे प्रकल्प गुजरात आणि दिल्लीत हलविण्यात आले आहेत.

पायाभूत सुविधांअभावी ढोलेरातून पळालेले प्रकल्प :
१) आयएसएमसी डिजिटल
२) जिओफोन
३) लॉकहीड मार्टीन कॉर्पोरेशन
४) एचडीसी
५) जीएसपीसी
६) वेदांता फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्प

महाराष्ट्राबाहेर गेलेले प्रकल्प :
१) तळेगाव येथे होणारा वेदांता फॉकस्कॉन : १ लाख ६९ हजार कोटींची गुंतवणूक - गुजरात
२) रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्प :  80 हजार कोटी गुंतवणूक - गुजरात
३) महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र - गुजरात
४) नागपूर येथील राष्ट्रीय कामगार शिक्षण मंडळ - गुजरात
५) जहाज तोडण्याचा उद्योग - गुजरात
६) पालघरमधील सागरी पोलिस अकादमी - गुजरात
७) एअर इंडिया मुख्यालय - दिल्ली
८) ट्रेडमार्क पेटंट कार्यालय - दिल्ली