BMC
BMC Tendernama
मुंबई

मुंबई महापालिकेतील विविध कंत्राटाच्या चौकशीने सनदी अधिकारी अस्वस्थ

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेत कोरोना काळात भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले महापालिकेचे तत्कालीन महापालिका अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरील कारवाईनंतर मंत्रालयातील सनदी अधिकाऱ्यांमधील अस्वस्थता वाढली आहे. सर्व आयएएस अधिकारी जयस्वाल यांच्या पाठीशी असून लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याच्या तयारीत आहे.

कोरोना काळात मुंबई महापालिकेने दिलेल्या विविध कंत्राटांची चौकशी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाद्वारे करावी, याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी संबंधितांना आदेश दिला आहे. दुसरीकडे सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी)वतीने महापालिकेची चौकशी सुरू झाली आहे. या चौकशी दरम्यान तत्कालीन महापालिका आयुक्त आणि ‘म्हाडा’चे विद्यमान उपाध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारी जयस्वाल यांच्याकडे संशयाची सुई फिरल्याने त्यांची ‘ईडी’ च्या वतीने चौकशी करण्यात येत आहे.

एखाद्या सनदी अधिकाऱ्याचा अशा पद्धतीने राजकीय बळी दिल्याने वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. आज जयस्वाल आहेत, तर उद्या अन्य अधिकाऱ्यांपैकी कोणी असेल, या भीतीने अनेक अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खालावले अनेक अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ही खदखद बोलून दाखवली. अशा पद्धतीने अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असेल, तर कोणताच अधिकारी धडाडीने काम करणार नाही, अशी भूमिका अधिकारी मांडत आहेत. जयस्वाल हे धडाडीने काम करणारे अधिकारी असल्यानेच त्यांना ‘म्हाडा’च्या उपाध्यक्षपदी आणले. कारण सरकारला वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करायचा आहे. मात्र असे असतानाही अशा अधिकाऱ्याची चौकशी करणे, म्हणजे दुसरा अधिकारी चौकटीच्या बाहेर जाऊन काम करण्यास धजावणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मंत्रालयातील सर्व सनदी अधिकाऱ्यांनी नुकतीच राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांची भेट घेऊन कैफियत मांडली. मात्र त्यानंतरही याबाबत काहीच मार्ग न निघाल्याने या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर नाराजी घालण्याचे ठरविले आहे.

कारवाईची तीव्रता कमी करणे शक्य
या संदर्भात एका निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सांगितले जयस्वाल यांच्या बाबत झालेली कारवाई किंवा चौकशी आता मागे घेणे शक्य नसले, तरी त्यावेळची परिस्थिती आणि त्यातून घेतलेले निर्णय याबाबत विचार व्हावा. त्यानुसार दिल्लीच्या अधिकाऱ्यांना विनंती करून कारवाईची तीव्रता कमी करता येणे शक्य आहे. जयस्वाल चुकले असतील, तर त्यांना वाचविण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न नाही. परंतु अशा प्रकारे एखाद्या अधिकाऱ्याला लक्ष्य करून चौकशीची कारवाई करणे चुकीचे असल्याचे असे मत या अधिकाऱ्याने व्यक्त केले.