dada bhuse Tendernama
मुंबई

Dada Bhuse : 12 पदरी महामार्गाबद्दल काय म्हणाले मंत्री दादा भुसे?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : वडपे ते ठाणे मार्गाचे काम प्रगतीपथावर असून रुंदीकरणाचे काम 67 टक्के तर खारेगाव खाडीपुलाचे काम 71 टक्के पूर्ण झाल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य मनिषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुसे बोलत होते. यावेळी सदस्य शशिकांत शिंदे, निरंजन डावखरे, किशोर दराडे यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.
                
वडपे ते ठाणे हा रस्ता पूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे होता असे सांगून मंत्री भुसे म्हणाले की, आता हा मार्ग विकासक म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे देण्यात आला आहे. 23.80 किलोमीटर लांबीचा हा मार्ग आहे. पूर्वी हा मार्ग 4 पदरी होता.

आता याठिकाणी 12 पदरी महामार्ग तयार करण्यात येणार आहे. एकूण तीन टप्प्यांमध्ये या महामार्गाचे काम सुरू आहे. तसेच या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असल्यामुळे वाहतूक सुरळीत ठेऊन अंडरपास व पुलाची कामे करण्यात येत आहेत. येत्या मे महिन्याच्या अखेरपर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होईल.

समृद्धी महामार्गाच्या आमनेपर्यंत एलिव्हेटेड रोड प्रस्तावित करण्यात आला आहे. याचा डीपीआर करण्याचे काम सुरू असून या मार्गामुळे नागपूर, नाशिक येथून ठाण्याकडे येताना वेळेची मोठी बचत होणार असल्याचेही मंत्री भुसे यांनी सांगितले.