Shaktipeeth Mahamarg Tendernama
मुंबई

संपूर्ण शक्तिपीठ महामार्ग रद्द केला पाहिजे; आझाद मैदानावर शेतकऱ्यांचा एल्गार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : फक्त कोल्हापूर पुरता नाही तर संपूर्ण शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा, असा एल्गार काँग्रेसचे विधान परिषद गटनेते सतेज पाटील यांनी पुकारला. नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा म्हणून शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने मुंबईत आझाद मैदान इथे धडक मोर्चाचे आयोजन केले होते.

या मोर्च्यात सहभागी होताना सतेज पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नागपूर-रत्नागिरी हा मार्ग आधीच उपलब्ध असताना शक्तिपीठ महामार्गाची नव्याने गरज का आहे? आजरा, संकेश्वर मार्गे फोर लेनिंग झालेले असल्याने मोपाला काही तासात पोहोचता येते. उपलब्ध रस्त्यांना जोडून कनेक्टिव्हिटी वाढवू शकतो त्यामुळे या प्रकल्पाचा फेरविचार करावा, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली. महायुती सरकार डबल ढोलकी सरकार आहे. निवडणुकी आधी शक्तिपीठ महामार्ग होणार नाही सांगतात, सरकार आल्यावर मात्र भूमिका बदलतात. एक मंत्री म्हणतात महामार्ग होणार नाही, एक मंत्री म्हणतात हा महामार्ग झाल्याशिवाय राहणार नाही. या सरकार मध्ये मंत्र्यांची तोंड तीन दिशेला आहेत त्यामुळे शेतकरी विरोधी या महामार्गाला आपण विरोध करू अशी टीका विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

आझाद मैदानावरील धडक मोर्च्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी उपस्थित होते. शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी एकजुटीने संघर्ष करायला पाहिजे. सरकारने बळजबरी करून शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेऊ नये असा इशाराही जयंत पाटील यांनी सरकारला दिला. आझाद मैदान येथील मोर्चाच्या वेळी माजी खा. राजू शेट्टी, आ. सचिन अहिर ,आ. विश्वजीत कदम, आ.दिलीप सोपल, आ.अरुण लाड, आ.कैलास पाटील, आ.प्रवीण स्वामी, आ.राजू भैया नवघरे, आ. राजेश विटेकर, आ.जयंत आसगावकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्यासह शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.