Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Tendernama
मुंबई

Chhagan Bhujbal : बुडत्याचा पाय खोलात? मंत्री छगन भुजबळांना न्यायालयाने का पाठवली नोटीस?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्र सदन घोटाळा (Maharashtra Sadan Scam) प्रकरणी निर्दोष सुटका झालेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे याच प्रकरणी पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

छगन भुजबळांसह निर्दोषमुक्त केलेल्या इतर आरोपींना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली असून चार आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना मनी लाँड्रींग प्रकरणातून निर्दोष सोडल्याविरोधात अंजली दमानिया यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

मुंबई विशेष सत्र न्यायाधीश सातभाई यांनी पुराव्यांकडे दुर्लक्ष करून भुजबळांना दिलासा दिल्याचा आरोप दमानियांकडून करण्यात आला आहे. 2021 मध्ये मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने ठराविक आरोपींना डिस्चार्ज केल्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

या संदर्भात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात जी केस दाखल होती ती दमानिया आम आदमी पार्टीत असताना दाखल झालेल्या जनहित याचिकेवर आधारावर होती. याच प्रकरणात न्यायालयाने एसआटी चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणी एसआयटी स्थापन झाल्यानंतर गुन्हा नोंदवला गेला होता. नंतर ईडीकडून देखील ईसीआयआर दाखल करण्यात आला होता. याच एसीबीच्या मूळ केसमध्ये आरोपींना डिस्चार्ज करण्यात आले आहे.

या निर्णयाविरोधात मूळ याचिकाकर्ता असल्याने दमानिया यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यानंतर न्यायालयाने यावर आता भुजबळंसह इतर सर्व आरोपींना नोटीस बजावली आहे. याचप्रकरणी सहआरोपी दीपक देशपांडेंना अद्याप दोषमुक्त केलेले नाही. देशपांडे तत्कालीन बांधकाम विभाग सचिव होते. त्यांनी दाखल केलेल्या दोषमुक्तीच्या याचिकेवर दोन आठवड्यात सुनावणी होणार आहे.

छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना वाटप केलेल्या विविध कंत्राटामधून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना रोख रक्कम लाचेच्या स्वरुपात मिळाल्याचा आरोप होता. महाराष्ट्र सदन व इंडिया बुल्स प्रकरणात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वतंत्र गुन्हे दाखल केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने भुजबळांविरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायदान्वये दोन गुन्हे दाखल केले होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी छगन भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. त्यांच्यासोबत त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी देखील दोषमुक्त करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली होती.