Hospital
Hospital Tendernama
मुंबई

BMC: मुंबईतील आणखी एका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगरमधील (Kannamwar Nagar, Vikroli) महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हाडाचा (MHADA) भूखंड घेण्यास मुंबई महापालिकेने (BMC) प्राधिकरणाला १३ कोटी ५६ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

पुनर्विकासात याठिकाणी ५०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार आहे. तळघर, तळमजला आणि १३ मजल्यांची रुग्णालय इमारत असून २१ मजल्यांची डॉक्टर/परिचारिका यांच्यासाठी स्वतंत्र निवासी इमारत प्रस्तावित आहे.

गेल्या सहा वर्षांपासून या रुग्णालयाचा पुनर्विकास रखडला आहे. या रुग्णालया शेजारीच म्हाडाचा सुमारे ३२ हजार ८२५ चौरस मीटरचा भूखंड आहे. तो एकत्रित करून पुनर्विकासात हे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार आहे.

म्हाडाच्या अखत्यारीत असलेला भूखंड महापालिकेला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबदल्यात म्हाडाने १३ कोटींची मागणी केली आहे. या रकमेचा भरणा केल्यानंतर प्राधिकरण पालिकेकडून ना-हरकत प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या प्रकरणी कन्नमवार नगरमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एक मेपासून आझाद मैदानात उपोषण सुरू करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

या आंदोलनाची दखल घेत महापालिकेतर्फे आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन म्हाडाला पैसे अदा करण्यात येणार असल्याची माहिती दिली. याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. महापालिकेच्या आश्वासनानंतर आझाद मैदानात उपोषण करणाऱ्या विक्रोळीतील रहिवाशांनी उपोषण मागे घेतले.

रुग्णालयाचा पुनर्विकास पूर्ण होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी रहिवाशांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. कन्नमवार नगरमध्ये सध्या बंद असलेले १६० खाटांचे शुश्रुषा रुग्णालय महापालिकेने ताब्यात देण्याची विनंती नागरिकांनी केली आहे.

महापालिकेने यासाठी एक समिती स्थापन केली आहे. लवकरच याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या पुनर्विकासातील महत्त्वाचा अडथळा दूर होणार आहे.