मुंबई (Mumbai : मुंबई आणि ठाण्याला जोडणारा आणि राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो प्रकल्पाची ६७ टक्के स्थापत्य कामे पूर्णत्वास आली असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएच्यावतीने देण्यात आली आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत मेट्रो-४ ठाण्यातून धावेल अशी शक्यता आहे.
गेल्या चार वर्षात शासनाच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये निरनिराळ्या तारखा घोषित करून देखील या मेट्रोचे काम अपूर्णच आहे. दररोज जीवघेण्या वाहतूककोंडीचा सामना करणारे ठाणेकर मेट्रोकडे डोळे लावून आहेत. नागरिकांसाठी मेट्रो-४ हा प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे. मात्र चारवेळा देण्यात आलेल्या डेडलाईन उलटून गेल्यानंतरही हा प्रकल्प अद्याप पूर्णत्वास आलेला नाही. ठाणे शहरामध्ये मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून २०१७ पासून मेट्रो प्रकल्पाच्या कामांना सुरुवात झाली. गेल्या ८ वर्षांमध्ये महामार्गावर मोठ्या प्रमाणात बॅरिगेटींग करून मेट्रोचे खांब उभारण्याची कामे सुरू असून ही कामे अंतिम टप्प्यात आहेत. काही ठिकाणी मेट्रोच्या स्टेशनची कामे सुरू असून आत्तापर्यंत वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो प्रकल्पाचे ६७ टक्के स्थापत्य कामे पूर्णत्वास आली असल्याची माहिती
एमएमआरडीएच्यावतीने देण्यात आली आहे. मात्र ज्या गतीने हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा करण्यात आली होती, त्या वेगाने हे काम सुरू नसल्याचे दिसत आहे. मेट्रो -४ हा प्रकल्प नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाप्रमाणेच रखडला आहे. आता हा प्रकल्प सुरू होण्यासाठी डिसेंबर २०२५ ही नवीन तारीख एमएमआरडीएच्यावतीने देण्यात आली असल्याने मेट्रो-४ मधून प्रवास करण्यासाठी नागरिकांना जवळपास २०२६ उजाडण्याची वाट पहावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवी मुंबई मेट्रो बांधून पूर्ण झाल्यानंतरही उद्घाटनासाठी एक वर्ष खोळंबून पडल्याचे यापूर्वीच्या अनुभवामुळे ठाणे मेट्रोबद्दलही दिरंगाईची भिती व्यक्त होत आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी शासनाकडून या भागातील गृहखरेदी विक्री व्यवहारावर मेट्रो सेजही लागू करण्यात आला आहे. मेट्रो सुरू होण्यापूर्वीच राज्य शासनाकडून सेजच्या माध्यमातून नागरिकांकडून शासकीय शुल्क आकारण्यात येत असले तरी हा प्रकल्प कधी पूर्ण होणार, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण प्रकल्प २०१९ मध्ये सुरू झाला असून ही मेट्रो २०२३-२४ पर्यंत होण्याचे ठरले होते. त्यानंतर ऑक्टोबर २०२४, डिसेंबर २०२५ आणि आता जून २०२६ पर्यंत लांबले आहे. तर २०२३ मध्ये सुरू झालेल्या कल्याण-तळोजा मेट्रोचे काम ऑक्टोबर २०२६ वरून आता डिसेंबर २०२७ पर्यंत लांबल्याचे समोर आले आहे.