Ajit Pawar Tendernama
मुंबई

Ajit Pawar: 150 कोटींच्या मोझरी विकास आराखड्याला सरकारचा Green Signal, पण...

पुढील १५ दिवसांत बैठक घेऊन मार्ग काढण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मोझरी क्षेत्रात मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी १५० कोटी रुपयांच्या मूलभूत विकास आराखड्यास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

तथापि या विकास आराखड्याअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या इमारतींपैकी तीन इमारती कोणाला हस्तांतरित करायच्या, त्यातील शैक्षणिक संकुल कोण व्यवस्थितपणे चालवू शकेल हे तपासून पाहण्यात येईल आणि यासंदर्भात संस्थेचे प्रमुख आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत पुढील १५ दिवसात बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य राजेश वानखेडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना ते बोलत होते.

श्री क्षेत्र मोझरी विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या कामांपैकी शैक्षणिक संकुल, भक्तनिवास, ग्रामविकास प्रबोधिनी आणि विशेष अतिथिगृह या इमारती हस्तांतरित करण्याची अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुल आश्रम या संस्थेने मागणी केली आहे. तथापि या इमारतींपैकी फक्त एका इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार आणि रस्त्याचे बांधकाम श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम संस्थेच्या जागेत असून, प्रत्यक्षात उर्वरित इमारतींचे बांधकाम शासनाच्या जागेत करण्यात आलेले आहे. संस्थेने ही ५.७० हेक्टर आर जमीन शासनाच्या नावे हस्तांतरित केलेली नाही, अशी माहितीही यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.