Housing
Housing Tendernama
मुंबई

मुंबईकरांकडून जूनमध्ये सरकारी तिजोरीत 800 कोटींची भर; हे आहे कारण

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईत सरत्या जून महिन्यात 9,729 मालमत्ता खरेदी व्यवहारांची नोंदणी झाली आहे. यात 84 टक्के मालमत्ता निवासी, तर 16 टक्के अनिवासी मालमत्तांचा समावेश आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत तब्बल ८०० कोटींचा महसूल जमा झाला आहे. या वर्षातील पहिल्या सहामाहीत मालमत्ता नोंदणींमधून संकलित झालेला महसूल 5,483 कोटींवर पोहोचला आहे.

आंतरराष्ट्रीय मालमत्ता सल्लागार कंपनी नाइट फ्रँक इंडियाने याबाबतचा एक अहवाल प्रकाशित केला आहे. 2023च्या पहिल्या सहामाहीत, मुंबईमध्ये 62,071 युनिट्सची नोंदणी झाली. गेल्या दशकातील पहिल्या सहामाहीतील ही दुसऱ्या क्रमांकांची घर नोंदणी ठरली आहे. त्याशिवाय, पहिल्या सहामाहीत मालमत्ता नोंदणींमधून संकलित केलेला महसूल हा 5,483 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील दशकभरातील संबंधित कालावधीत नोंदवलेला हा सर्वाधिक महसूल असल्याचे सुद्धा नाइट फ्रँकच्या अहवालात म्हटले आहे.

उत्पन्नात वाढ, घर खरेदीबाबत ग्राहकांमध्ये असलेला सकारात्मक दृष्टीकोण आदी कारणांमुळे मालमत्ता नोंदणीत वाढ झाली आहे. याच कारणांमुळे मागील वर्षी जून महिन्यातील मालमत्ता नोंदणी आणि या वर्षातील मालमत्ता नोंदणी याची तुलना करता जून महिन्यातील मालमत्ता खरेदीचा ट्रेंड कायम असल्याचे दिसून आले आहे.

मालमत्ता नोंदणीत वाढ झाल्यामुळे राज्याच्या महसुलात वाढ झाली आहे. अलीकडील काही वर्षात मुंबई रिअल इस्टेट बाजारपेठेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. व्याज दरात झालेली वाढ, मुद्रांक शुल्कातही वाढ करण्यात आली होती. आदी अडचणी असतानाही मुंबईत मालमत्ता खरेदीचे प्रमाण स्थिर राहिल्याचे चित्र आहे.

नाइट फ्रँकचे व्यवस्थापकीय संचालक शिषिर बैजल यांनी म्हटले की, मुंबईत घर खरेदी करण्याकडे लोकांचा ओढा आहे. रिअल इस्टेट बाजारपेठेसमोर अडचणी असल्या तरी मालमत्ता खरेदी केली जात आहे. कोविड-पूर्व कालावधीपासून निवासी आणि अनिवासी मालमत्तेच्या नोंदणीत 85 टक्क्यांची वाढ दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले.