Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : कलावंतांचा पावसाने केला 'खेळ' ठेकेदाराचे बॅडलक

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : 'अवकाळी’ हा शब्द अवकळा निर्माण करणाराच असतो. गारपिटीसह येणारा, भुरभुरणारा, अवचित सुखाची लहर उमटवणारा, वातावरण धुंद करणारा पाऊस म्हणजे अवकाळी पाऊस. या अवकाळी पावसाने शहरातील आमखास मैदानातील मेला कलावंताना उपासमारीची वेळ आणली आहे. पावसाने प्रत्येक कलावंताचे मोठे नुकसान झाले आहे. यात टेंडर काढून जागेचे भाडे वसुल करणारे वक्फ बोर्ड मात्र मालामाल झाले आहे. ठेकेदाराने कलावंतांचे नुकसान झाल्याचे म्हणत बोर्डापुढे हात जोडले. मात्र तेथील अधिकारी काही ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे ठेकेदारालाच कलावंतांचा पोशिंदा व्हायची वेळ आली आहे. यासंदर्भात 'टेंडरनामा' प्रतिनिधीने लोकप्रतिनिधींना देखील वस्तुस्थिती सांगितली पण बघु, करू, जिल्हाधिकाऱ्यांशी बोलू यापलिकडे दुसरे काहीही ठोस उत्तर मिळाले नाही.

आमखास मैदानातील हुशार पन्नालाल, ट्रेन, झुला, ब्रेक डान्स, टोराटोरा, चक्री, स्लंबो, च्युरोफ्लेन, जादुवाला, क्राॅस, नौका आदी खेळातून मनोरंजनाच्या बदल्यात मिळणारा पैसा आणि कौतुकाची थाप सारे काही बंद झाले आहे. गेल्या दहा दिवसांपासून येथील कलावंतांचा चेहरा मलूल झालाय. त्यांच्या अंगावर मळकट, ठिकठिकाणी ठिगळं लावलेली फाटकी कापड घालण्याची वेळ आली आहे. धान्याच्या रिकाम्या डब्यात ते आपल्या चिल्यापिल्यांचे रडवेले तोंड पाहत आहेत. वक्फ बोर्डाकडे जागेचे भाडे भरायचे, ठेकेदाराच्या हातात पैसे टेकवायचे म्हणून अनेकांनी खाजगी सावकाराकडून ‘उचल’ घेतली आणि या कलावंतांचे आयुष्यच गहाण पडले. आता पोटाची भूक भागवण्यासाठी येथील कलावंतांना छत्रपती संभाजीनगरकरांकडे मदतीची याचना करावी लागत आहे. कारण...? अवकाळी पावसाने लोकांकडून पै-पै गोळा करण्याची वेळ आणली. याच अवकाळी पावसाने या कलावंतांच्या आयुष्याची परवड झाली.

पावसामुळे कलावंताच्या आयुष्यातील पुंजी रिती झाली. फाटलेल्या पडद्यांना ठिगळ लावता लावता कलावंतांचे जिणे चिखल होऊन गेले. अवकाळी पावसाने  गुंडाळलेल्या तंबुत त्यांचे  सुखही निष्प्राण होऊन पडले.अनेकांची भविष्यवानी सांगणारा पन्नालाल आज गवताला महाग झालाय. जादुवाला देखील अवकाळी पाउस बंद करू शकत नाहीए. इतरांच्या मनोरंजनासाठी स्वत:चे दुःख बाजुला ठेवणारी कलाकार मंडळी पोटापाण्यासाठी मोताद झाली आहे. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरवणारा आणि त्यांच्या मनोरंजनाचे हक्काचे ठिकाण म्हणजे मेला. मैल्यातील तंबूभोवती गर्दी जमली की कलाकारांच्या चेहर्‍यावर हसू उमटते. मात्र तंबु टाकल्यापासून आज चार पैसेही त्यांच्या हातात न पडल्याने त्यांचे डोळे तरळून उठले आहेत. चाळीस दिवसाच्या मेल्यात तंबु टाकुन खेळातून कमावलेले ‘डबोले’ घरी नेऊ, या आशेवर इथला प्रत्येक कलाकार असतो. मात्र त्यांचा डौलदार वाटणारा तंबू अवकाळी पावसाने लोळागोळा होऊन पडला आहे. प्रयोगच बंद पडल्याने मालकाकडे पगारासाठी पुढे गेलेले तळहात रिकामेच मागे येत आहेत. डोक्यावर लाखो रुपयांची देणी घेऊन कलाकारांना आपल्या घरी जायची वेळ आली आहे.

काय आहे नेमक प्रकरण

वक्फ बोर्डाने शहरातील आमखास मैदानाच्या दहा हजार स्केअर फुट जागेत ४० दिवसासाठी मेला भरवण्यासाठी २४ मार्च रोजी २० लाखाचे टेंडर काढले होते. यात अय्युबखान, शेख जुबेर, वायास खान, जहीरखान, शेख सुबान, मोबीन शेख, अतीकखान यांनी सहभाग नोंदवला होता. यात ए.आर. एजन्सी यांना ठेका मिळाला. यानंतर ठेकेदाराने बुलढाणा, सोलापुर, पैठण, हिंगोली, मालेगाव, चंद्रपुर, लातुर, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशातील कलावंतांना पाचारण करण्यात आले. प्रत्येक कलावंतांकडून ठेकेदाराने वक्फबोर्डाकडे टेंडरच्या अतिशर्तीनुसार सुरक्षित अनामत रक्कम आणि जागेचे भाडे भरण्यासाठी रक्कम वसुल केली. यात वीस दुकाने आणि खेळण्यांचा समावेश होता. मात्र ज्या दिवशी मेला लावला. त्याच दिवशी अवकाळी पाउस वारा - वादळाने येथील कलावंत आणि दुकानदारांच्या राहुट्या उडुन गेल्या. लाईटींग, मोटारी जळाल्या , पत्रेही उडाले. पावसाळे मनोरंजनाचा खेळच थांबल्याने कलावंतांचा पोटापाण्याचा प्रश्न उपस्थित झाला. यासंदर्भात ठेकेदार शुल्क माफीसाठी वक्फ बोर्डाकडे विनवनी करत आहे. मात्र तिजोरी मालामाल झालेल्या बोर्डाने हातवर केलेले आहेत तर शहरातील लोकप्रतिनिधी यांनी देखील पाठ फिरवली आहे.