Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : खांब न हटवताच मुकुंदवाडी चौकाचे रुंदीकरण; कशी फोडणार वाहतूक कोंडी?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महावितरण कंपनी आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करूनही रस्त्याच्या मधोमध विद्युत खांबांच्या शिफ्टिंगचे काम होत नसल्यामुळे मुकुंदवाडी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत  या रस्त्याचे काम कंत्राटदारामार्फत सुरू करण्यात आले आहे. परिणामी रस्त्याचे रुंदीकरण होऊन देखील प्रवाशांना त्रास होणार असून, वाहतुकीची कोंडी कशी फोडणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सिडको एन-२ मुकुंदवाडी परिसरातील जालनारोड लगत दक्षिणेला मुकुंदवाडी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत दोनशे मीटर लांबी व साडेसात मीटर रुंदीचा हा रस्ता डांबराचा रस्ता करण्यात येत आहे. या रस्त्याचे काम शीतल पहाडे यांच्या बालाजी कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे.

या कामासाठी मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव दिनानिमित्त नगर विकास विभागाने शहरातील पायाभूत सुविधांसाठी दिलेल्या निधीतून ७० लाख रुपये महानगरपालिका प्रशासन खर्च करत आहे. त्यादृष्टीने रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. विविध पॅचमध्ये रस्त्याचे काम केले जात आहे. काही महिन्यांपूर्वी आसपासच्या नागरिकांना महानगरपालिकेने भूसंपादन न करताच पाडापाडी केल्यामुळे रस्त्याचे काम नागरिकांनी बंद केले होते. मावेजा दिल्यानंतर रस्त्याचे काम सुरू करा, अशी मागणी त्यांनी केली होती, पण महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता बी. डी. फड यांनी नागरिकांची समजूत काढून कसेबसे काम सुरू केले.

मात्र अडथळा ठरणारे वीजेचे खांब व डीपी न हटवताच रस्त्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसह महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून देखील खांब शिफ्टींगचे काम मार्गी लागले नाही. खांब तसेच ठेऊन काम सुरू केल्याने रुंदीकरणानंतर देखील वाहतुकीचा खोळंबा होणार असल्याची चर्चा या भागात पसरलेली आहे.

कंत्राटदाराने या रस्त्यावर खोदकाम करून गिट्टी अंथरणे सुरू केले आहे. जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खणून ठेवण्यात आला आहे. पण खांब न हटवताच काम सुरू केल्याने रुंदीकरणानंतरही अपघाताचा धोका कायम असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. महानगरपालिका प्रशासकांनी याची दखल घेऊन तातडीने खांब शिफ्ट करण्याचे आदेश संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी मुकुंदवाडी भागात जोर धरत आहे.