Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : झाडाझडती सुरू, बडे मासे अडकणार; 2019 पासूनच्या दस्तनोंदणीच्या चौकशीचे आदेश

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर महानगर क्षेत्रामध्ये बनावट आदेश करून मंजूर आराखड्यातील ना-विकास क्षेत्रामध्ये दिलेल्या दाखल्यात छेडछाड करून व दस्तऐवजांचे बनावटीकरण करून अकृषिक परवानगी देण्याचे प्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत.

याबाबत छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी आढावा घेतला. दस्तनोंदणी विभागाकडे 15 ऑगस्ट 2019 पासूनच्या प्राधिकरण कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत दस्ताऐवजांची कायदेशीर सत्यता तपासून अहवाल सादर करावा, असे असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात दस्तऐवजांचे बनावटीकरण करून अकृषिक परवानगी देण्याच्या प्रकारांबाबत विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी आज आढावा घेतला. यावेळी महानगर नियोजनकार रविंद्र जायभाये, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोलकर, तहसीलदार रमेश मुंडलोड, पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण, तहसीलदार कृष्णा कानगुले, खुलताबादचे तहसीलदार स्वरूप कंकाळ, गंगापूरचे तहसीलदार सतिष सोनी, महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रशासन अधिकारी सुनंदा पारवे, सहाय्यक दुय्यम निबंधक राजेश राठोड उपस्थित होते.

विभागीय आयुक्त अर्दड म्हणाले, महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयासह सबंधित यंत्रणांनी दस्तऐवजांचे बनावटीकरण करून अकृषिक परवानगी देण्याच्या बाबींना आळा बसावा यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्राप्त प्रकरणांची चौकशी करावी व याबाबतचा अहवाल सादर करावा. महानगराच्या नियोजनबद्ध विकासाच्या उद्देशाला व त्यादृष्टीने केलेल्या नियोजनास हे प्रकार प्रतिकूल ठरत आहेत.

तसेच त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, आपल्या कार्यक्षेत्रात एनए-44 साठी उपलब्ध कागदपत्रे मूळ रेकॉर्डला धरून आहेत का, याबाबतही तपासणी करा, असे प्रकार पुढे घडू नयेत, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी सबंधित यंत्रणेला दिल्या. महानगर नियोजनकार रविंद्र जायभाये यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी सबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत देण्यात आलेल्या ठळक सूचना

1) छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाने मंजूर केलेल्या रेखांकनातील भूखंडांचीच केवळ खरेदी-विक्री दस्त नोंदणी संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयाने करावी

2) नियमितीकरण न झालेल्या गुंठेवारी भूखंडांची कोणत्याही परिस्थितीत खरेदी-विक्री दस्त नोंदणी करू नये

3) दस्त नोंदणी करताना शेतजमीन तुकडेबंदी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी

4) मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी यासंबंधी तपासणी करून नियमित आढावा घ्यावा

5) मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी प्राधिकरण कार्यक्षेत्रातील 15 ऑगस्ट 2019 पासून भूखंडाचे नोंदणीकृत दस्ताऐवजांची कायदेशीर सत्यता तपासावी व त्याबाबतचा सविस्तर अहवाल नोंदणीकृत दस्ताऐवजांच्या प्रतीसह सादर करावा.

अकृषक आदेश/ सनद मधील परस्पर फेरबदलाबाबत सूचना

1) नियोजन प्राधिकरणाने विकास परवानगी दिलेली नसताना देखील कोणत्या तरतुदीच्या आधारे अकृषक आदेश/सनद निर्गमित करण्यात येतात? याबाबतची माहिती सादर करा.

2) परस्पर बोगस अकृषक सनद/आदेश बनविणाऱ्या विरुद्ध तसेच बनावट कागदपत्रे सादर करुन अकृषक आदेश प्राप्त करणाऱ्या विरुद्ध कोणती कायदेशीर कार्यवाही केली जाते? याबाबतची माहिती सादर करा.

3) बोगस अकृषक आदेशाबाबत परीपुर्ण माहिती तात्काळ सादर करा.

4) अकृषक सनद निर्गमित करतांना संचिके सोबत सादर करण्यात आलेल्या दस्तऐवजांची सत्यता पडताळणी करावी व दस्तऐवजांचे प्रमाणिकरण झाल्या नंतरच अकृषक आदेश/सनद निर्गमित करावेत.

5) तहसीलदार यांनी नियोजन प्राधिकरणाने दिलेल्या विकास परवानगीतील नमूद मंजूर प्रयोजनासाठी अकृषक सनद/आदेश निर्गमित करावी. केवळ झोन दाखल्याच्या आधारे तहसील कार्यालयाने कोणतीही अकृषक सनद निर्गमित करू नये.

6) निवासी उपजिल्हाधिकारी यांनी उपरोक्त सर्व बाबींची तपासणी करून नियमित आढावा घ्यावा व त्याबाबतचा अहवाल वेळोवेळी या कार्यालयास सादर करावा.

अनधिकृत विकास/बांधकाम बाबत सूचना

1) 24 फेब्रुवारी 2020 रोजीच्या आदेशान्वये संबंधित तहसिलदार यांना प्राधिकरण क्षेत्रातील अनाधिकृत बांधकाम नियंत्रक म्हणून प्राधिकृत केलेले आहे. त्यानुसार तहसिलदार यांनी त्यांच्या हृदीतील अनाधिकृत बांधकामाचा आढावा घ्यावा व प्राप्त/ प्रदान अधिकारान्वये अनाधिकृत बांधकामावर कार्यवाही करावी.

2) तहसिलदार यांनी स्वतः च्या कार्यक्षेत्रात सर्वेक्षण फरुन अनधिकृत विकास/ बांधकाम करणाऱ्या बांधकाम धारकास एमआरटीपी अधिनियम 1966 चे कलम 53 व 54 अन्यये विहित मुदतीची नोटीस देण्याची कार्यवाही करावी.

3) विना परवानगी बांधकाम करत असलेल्या बांधकामधारकांचे एमआरटीपी अधिनियम 1966 चे कलम 54 अन्वये काम थांबवणे व त्यांना नियमानुसार संबंधित नियोजन प्राधिकरणाकडून परवानगी घेणे संबंधी सूचना द्याव्यात.

4) उक्त प्रमाणे बजावलेल्या नोटीसीनुसार मुदतीत अंमल न केलेल्या बांधकामधारकांचे अनधिकृत बांधकामे निष्कासित करावे.

5) किंवा अनधिकृत बांधकाम निष्कासित न केल्यास संबंधित बांधकाम धारका विरुद्ध एमआरटीपी अधिनियम 1966 चे कलम 53 व 54 अन्वये पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे नोंद करावी.

6) तहसीलदार यांनी यासंबंधी नियमितपणे कार्यवाही करून विहित नमुन्यात मासिक अहवाल सादर करावा.