Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : बांधकाम कामगारांना दिले जाते निकृष्ट मध्यान्ह भोजन

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदीत कामगारांसाठी चालवण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेत कामगारांना निकृष्ट दर्जाचे भोजन देण्यात येत आल्याची तक्रार भिमशक्ती असंघटीत कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष प्रेम उर्फ रवी चव्हाण यांनी कामगार उप आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर तसेच सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई येथे तक्रार दाखल केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दोन दिवसापुर्वी बालाजीनगरात चक्क फ्लाॅवर कोबीच्या भाजीत आळ्या निघाल्याचे समोर आले. तेथील कामगारांच्या तक्रारीनंतर धास्तावलेल्या कामगार उपायुक्त कार्यालयामार्फत सरकारी प्रयोगशाळेत भोजन तपासण्यासाठी दिल्याचे अधिकारी सांगत आहेत.

विशेष म्हणजे याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने देखील ठेकेदाराच्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीत जाऊन स्वयंपाक घर आणि गोडाऊनची तपासणी केली असता तब्बल २८ त्रुटी आढळून आल्याने त्याला नोटीस बजावल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी डाॅ. वर्षा रोडे तसेच सह आयुक्त डी. व्ही. पाटील यांनी टेंडरनामा प्रतिनिधीला सांगितले. या विभागामार्फत देखील भोजणाचे नमुने सरकारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असल्याचे पाटील यांनी सांगितले. अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असेही ते म्हणाले.

याप्रकरणी चव्हाण यांनी 'टेंडरनामा' प्रतिनिधीकडे तक्रार केल्यानंतर प्रतिनिधीने सलग तीन दिवस कंपनीमार्फत भोजन वितरीत केले जात असलेल्या बांधकाम आणि नाक्याच्या ठिकाणी पाहणी केली, असंख्य कामगारांशी संवाद साधला असता भोजन निकृष्ट असल्याचे कामगारांनी सांगितले. दरम्यान बुधवारी प्रतिनिधीने थेट कंपनीचे कार्यालय गाठले. तेथील रवी केलाणी या प्रकल्प व्यवस्थापकाला थेट सवाल केला. मात्र त्यांनी आरोप फेटाळून लावले. दरम्यान प्रतिनिधीला स्वतः जेवण करा, मगच खात्री करा, असे म्हणत जेवणाचा आग्रह केला. जेवणात भाताला दुर्गंध असल्याचे निदर्शनास आले. बुधवारी शहरात भोजनात पोळ्या वाटप केलेल्या असताना केलानी यांनी मशीन खराब असल्याचे कारण पुढे करत पोळ्या दाखवण्यास टाळाटाळ केली.

असे आहेत तक्रारदारांचे आरोप

नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजन योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने १९ मार्च २०१८ रोजी टेंडर मागविण्यात आले होते. त्यात १ मार्च २०१९ रोजी मंडळाने गुनानी कमर्शियल प्रा. लि. या कंपनीचे टेंडर मंजुर केले होते. त्यानुसार काही अटी व शर्तीनुसार त्याला अमरावती, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, अहमदनगर, सांगली, सातारा, सोलापूर, नांदेड, लातुर, बीड , जालना, भंडारा, चंद्रपुर, वर्धा या १७ जिल्ह्यातील बांधकामाच्या ठिकाणावरील व नाक्याच्या ठिकाणावरील नोंदनीकृत बांधकाम कामगारांना भोजन वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील त्याचा भोंगळ कारभार पाहता इतर जिल्ह्यात काय स्थिती असेल, असा संशय बळावत आहे.

● बांधकाम कामगारांना निकृष्ट जेवण देऊन ठेकेदार स्वतःचे उखळ पांढरे करत आहे.

● २६ फेब्रुवारी २०१९ रोजी ठेकेदार गुनीना कमर्शियल प्रा. लि. व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात झालेल्या करारनाम्यातील अटी-शर्तीनुसार बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन दोन मेनुनुसार पुरवले जाईल. त्यात एका आठवड्याच्या व प्रत्येक महिन्यात मेनू बदलला जाईल. मात्र ठेकेदाराकडून या अटीचे पालन केले जात नाही.

● करारनाम्यानुसार सहा रोटी ३०० ग्राम (भाजलेली), २५० ग्रॅम पातळ व कोरडी भाजी, गुळ २० ग्राम, दोन हिरव्या मिरच्या, आंबा लोणचे, सलाद ४० ग्रॅम. पुर्ण १२०० कॅलरीजयुक्त भोजन. दुसऱ्या मेनूत ४०० ग्रॅम शिजलेला भात, सुखी भाजी १२५ ग्रॅम, २५० ग्रॅम दाळ, गुळ २० ग्रॅम, सलाद ४० ग्रॅम, चटणी किंवा आचार, हिरवी मिर्चीचे दोन तुकडे अशा पद्धतीने ११५० कॅलरीयुक्त भोजन पुरवणे.