औरंगाबाद (Aurangabad) : जवाहरनगर पोलिस स्टेशन ते टिळकनगर सहा कोटी २८ लाखांच्या व्हाइट टाॅपिंग रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. यासंदर्भात 'टेंडरनामा'कडून थेट सवाल होताच आयआयटीकडून अभिप्राय आल्यावर रस्त्याची दुरुस्ती केली जाईल, शिवाय ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर देखील निश्चित कारवाई केली जाईल, अशी ग्वाही डेप्युटी सीईओ सौरभ जोशी यांनी दिली आहे. एकंदरीत जवाहरनगर पोलिस स्टेशन ते टिळकनगर रस्त्याच्या निकृष्ट बांधकामानंतर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत इतर २१ रस्त्यांच्या बांधकामावर 'टेंडरनामा'च्या स्पाॅट पंचनामानंतर प्रश्न उपस्थित होत आहेत.
तत्कालिन मनपा प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्मार्ट रस्ते एक मानला जातो. मोठ्या प्रयत्नातून त्यांनी शहरातील १०८ खड्डेमय रस्त्यांसाठी ३१७ कोटींचा निधी खेचून आणल्याचे सांगितले जात होते. मात्र ठेकेदाराला ३१ मार्च २०२२ आधी वर्क ऑर्डर न दिल्याने तसेच मनपात खर्चाची तरतूद नसल्याने त्यांनी ३१७ कोटींपैकी २३७ कोटीतील ८६ रस्त्यांना कात्री लावली. त्यानंतर ८० कोटीतून २२ रस्ते स्मार्ट करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सद्यस्थितीत होत असलेल्या कासवगती आणि रस्त्यांची निकृष्ट अवस्था पाहता तत्कालिन मनपा प्रशासकांच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे दिसत आहे.
जवाहरनगर पोलिस स्टेशन ते टिळकनगर रस्त्याचे बांधकाम मागील चार महिन्यांपासून अतिशय संथगतीने सुरू आहे. सध्या १३०० किमी लांबी आणि सात मीटर रुंदीच्या एका बाजूने काँक्रिटचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. त्या कामाचा दर्जा अतिशय खालावलेला आहे. 'टेंडरनामा' प्रतिनिधीकडे आलेल्या तक्रारीनंतर प्रतिनिधीने सलग दोन दिवस रस्त्याची पाहणी केली. त्यात कुठे काय आढळले त्याचा हा सविस्तर अहवाल...
● शिवशंकर काॅलनी व्यंकटेशनगर बालाजी मंदीर कमानीपासून रस्त्याच्या उतारातील एक्सपंशन गॅपमध्ये पॅव्हरब्लाॅक न टाकल्याने उतारावरून थेट खड्ड्यातून वाहने बाहेर काढताना नागरिकांना अपघाताचा धोका वाढला आहे.
● पुढे कंधारकर हाॅस्पिटल ते विभागीय वन अधिकारी वन्यजीव कार्यालय प्लाॅट नंबर १०२ व्ही. पी. जगदाळे यांच्या घरासमोर देखील एक्पंशन गॅप उघडाच ठेवल्याने वाहनांची आदळआपट होऊन नागरिकांना पाठदुखीचा त्रास वाढला आहे.
● पुढे उल्कानगरी हद्दीतील डाॅ. मंजिरी जोशी यांच्या अमेय स्किन व काॅस्मेटाॅलाॅजी क्लिनिक सेंटर ते प्लाॅट क्रमांक-१ आनंद बडवे यांचे निवासस्थान ते विश्वभारती काॅलनी प्रवेशद्वार, प्लाॅट क्रमांक - ४२ रमेश गुमास्ते यांचे निवासस्थान ते जोधपूर स्विट्स ते गायल हाॅस्पिटल ते ॲड. संजय हिवरेकर यांच्या निवासस्थानासमोर उखडलेल्या रस्त्यात आरपार लहान मोठ्या भेगा पडलेल्या आहेत.
● पुढे चेतक घोडा चौकातील सखल भागातील काँक्रिटीकरण न करता मध्येच रस्ता अर्धवट सोडून देण्यात आला आहे. परिणामी वाहनधारकांना आगीतून फोफाट्यात आल्याचा त्रास सोसावा लागत आहे. ठेकेदाराची हद्द म्हणजे गेल्या चार महिन्यांपासून येथे पाइपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यात ड्रेनेजचे पाणी ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याने चेतक घोडा चौकात तळे साचले आहे. धक्कादायक म्हणजे लगतच असलेल्या आदित्य डायग्नोस्टीक सेंटरमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना दुर्गंधीचा त्रास सोसावा लागत आहे.
● पुढे व्यंकटेश काॅलनी हद्दीतील प्लाॅट क्रमांक - १८ रामचंद्र श्रीनिवास कल्लोळे यांच्या घरासमोरच गत आठ दिवसापासून एक्सपंशन गॅपमध्ये उघडाच ठेवलाय. विशेष म्हणजे शेजारीच पॅव्हरब्लाॅक ठेऊन दोन फुटाचा रस्ता अडवत ठेकेदाराने हलगर्जीपणाचा कळस गाठला आहे.
● पुढे अग्नीहोत्र चौक ते उल्कानगरी प्लाॅट क्रमांक - ९ ते डी. एम. ठाकूर यांच्या घरासमोर नव्याकोऱ्या रस्त्याच्या मधोमध ड्रेनेज चेंबर खोल गेल्याने गोलाकार खड्डा चुकविण्यासाठी वाहनधारकांची त्रेधातिरपीट होत आहे.
● पुढे याच रस्त्याच्या उत्तरेला ओमकारेश्वर मंदिराकडून भगीरथ काॅलनीकडे जातांना नव्या रस्त्याची उंची वाढल्याने थेट चार फुटाचा खड्डा पडलाय. येथील रहिवाशांची जुन्या रस्त्यावरून नवीन रस्त्यावर येताना दमछाक होताना दिसली. विशेषतः परिसरातील जेष्ठांना भयंकर त्रास वाढल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.
● पुढे उल्कानगरीपासून प्लाॅट नंबर - ५ ते बॅक ऑफ इंडिया हेडगेवार रुग्नालयाकडे जाणाऱ्या जोड रस्त्याचे काम अर्धवट ठेवले आहे. लगतच ज्योती काॅम्प्लेक्स समोर रस्त्याच्या मधोमध डीपी न हटवल्याने चार फुटाचा रस्ता अडला आहे. या इमारतीसमोरच रस्त्याचा पृष्ठभाग जागोजागी उखडलेला आहे. भर पावसाळ्यात काॅंक्रिट रस्त्याचे काम झाल्यामुळे ठेकेदाराचा क्युरिंगसाठी पाणी मारायचा खर्च देखील वाचला. मात्र पावसाळ्यानंतर ठेकेदाराने पाणी मारले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्याचबरोबर खडी उखडून रस्त्यावर पसरल्याने वाहनांचे अपघात वाढले असल्याचे नागरिक सांगत आहे. प्रकरणी स्मार्ट सिटी डेव्हलोपमेंटचे सीईओ तथा मनपा प्रशासकांकडून या रस्त्याच्या चौकशीची मागणी नागरिकांनी केली आहे.
● रस्त्याच्या मधोमध काही ठिकाणी एक्सपंशन उघडे गॅप गट्टूंनी भरले. मात्र त्याची लेव्हल बरोबर केली नसल्याने गतिरोधकावरून वाहन नेत असल्याचा भास वाहनधारकांना होत आहे.
● रस्त्यावर काॅंक्रिट अंथरल्यानंतर व्हायब्रेनरने पुरेशी दबाई न केल्याने वाहन चालवताना चढ उतार येत असल्याने घोड्यावरून प्रवास केल्याचा मनमुराद आनंद मिळत आहे. याचा साक्षी पुरावा म्हणजे रस्त्याच्या कडांना भूंगा लागलेला आहे. पॅव्हरब्लाॅकच्या कामात तो दाबण्याचा ठेकेदाराकडून जुगाड सुरू आहे.
● फुटपाथसाठी वापरण्यात आलेल्या गट्टूचा दर्जा देखील अयोग्य असल्याची याभागात जोरदार चर्चा आहे.
● रस्त्याची उंची पाहता पावसाळ्यात उल्कानगरी, जवाहर काॅलनी, टिळकनगर , विश्वभारती काॅलनी, व्यंकटेशनगर , शिवनेरी काॅलनीतील अंतर्गत रस्ते पाण्याखाली जातील. रस्त्यालगत रहिवाशांच्या दारात पाणीच पाणी तुंबेल.
● धक्कादायक म्हणजे जुना लोखंडी दुभाजक न काढताच रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याने काम झाल्यावर दुभाजक काढल्यास रस्ता खराब होईल, अशी शंका या भागात व्यक्त केली जात आहे.
धीम्या गतीने बांधकाम होत आहे
जवाहरनगर पोलिस स्टेशन ते टिळकनगर हा रस्ता उल्कानगरी, गारखेडा, जवाहर काॅलनी व शहानुरवाडीसह अनेक रस्त्यांना जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. गत चाळीस वर्षापासून या रस्त्याचे काम होत नव्हते. माजी महापौर त्र्यंबक तुपे , माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी, माजी उप महापौर स्मिता घोगरे यांच्या सततच्या पाठपुराव्याने तत्कालिन मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या प्रयत्नाने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत या व्हाइट टाॅपिंग रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या बांधकामासाठी सुमारे सहा कोटी २८ लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली. औरंगाबादेतील ए. जी. कन्सट्रक्शन कंपनी या एकाच ठेकेदाराकडे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत या रस्त्यासह इतर २१ रस्त्यांच्या कामाचा ठेका आहे. परंतु स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटचा प्रकल्प अभियंता इम्रान खान याच्यासह अतिरिक्त मुख्याधिकारी अरूण शिंदे व इतर अधिकाऱ्यांनीच डोळेझाक केल्याचे कामाच्या दर्जावरून दिसून येत असल्याची ओरड नागरिक करीत आहेत.
हा तर खेड्यातील पांदीचा रस्ता
एखाद्या खेडेगावातील पांदीच्या रस्त्याप्रमाणे या व्हाइट टाॅपिंग रस्त्याचे बांधकाम होत असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले आहे. पावसाळा संपण्याच्या महिनाभराचा कालावधी बाकी असताना गत चार महिन्यांपासून ठेकेदाराकडून अतिशय धीम्या गतीने बांधकाम होत आहे. सद्यस्थितीत टिळकनगर ते चेतक घोडा रस्त्याची दुसरी बाजू तयार करण्याचे काम ठेकेदाराने हाती घेतले आहे. परंतु दुसरी बाजू तयार करण्याआधीच पहिल्या बाजूतील रस्त्याचा पृष्ठभाग सोलून निघाल्याने हा रस्ता किती वर्ष टिकणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
काय गुणवत्ता तपासते मुंबईची आयआयटी?
विशेष म्हणजे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्मार्ट रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत यासाठी मुंबईच्या आयआयटी संस्थेची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने रस्ते कसे तयार करावेत, त्यांची गुणवत्ता तपासणीचे कामही मुंबईच्या आयआयटी संस्थेला देण्यात आले आहे. रस्ते बांधनीपूर्वी व नंतर बांधकामादरम्यान आयआयटीचे एक पथक सातत्याने शहरात दाखल होते. रस्त्यांची पाहणी करते. मात्र, जवाहरनगर ते टिळकनगर रस्त्याचे निकृष्ट काम 'टेंडरनामा'ला दिसते, पथकाला दिसत नाही काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रकल्प अभियंता बेफिकीर
या संपूर्ण निकृष्ट बांधकामाची पाहणी केल्यानंतर 'टेंडरनामा' प्रतिनिधीने प्रकल्प अभियंता इम्रान खान यांना सातत्याने दुरध्वनीवर संपर्क केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यावर प्रतिनिधीने त्यांना फोटो देखील व्हाॅटसप केले. मात्र, खान यांनी त्यावर देखील प्रतिक्रीया दिली नाही. यावरून त्यांना या प्रकल्पाविषयी कुठलीही आस्था नसल्याचे दिसून येत आहे.
फोटो पाठवा कारवाई करू
यानंतर प्रतिनिधीने स्मार्ट सिटीचे सीईओ सौरभ जोशी यांनी संपर्क केला. त्यांनी आपल्याकडील फोटो पाठवा, ते मी आयआयटीच्या अधिकाऱ्यांना पाठवतो. त्यांचा अभिप्राय आल्यावर मनपा प्रशासक तथा सीईओंशी चर्चा करून रस्त्याची दुरूस्ती व संबंधितांवर निश्चित कारवाई करू, असे त्यांनी सांगितले.
फोटो पाठवताच ठेकेदाराची बोलती बंद
'टेंडरनामा' प्रतिनिधीने फोटो पाठवण्याआधी ठेकेदार ए. जी. कंन्सट्रक्शन कंपनीकडे रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत विचारणा केली असता, त्यांनी तारेचा ब्रश लागल्याचे कारण पुढे केले होते. दुसरीकडे प्रतिनिधी या रस्त्याचा स्पाॅट पंचनामा करत असताना तेथील ठेकेदारच्या उपस्थित अधिकाऱ्यांना थेट सवाल केला असता पावसाळ्यात काम झाल्याने काॅंक्रिट वाहून जाऊ नये म्हणून पाॅलिथिन अंथरायचो. ते काढल्यावर ओले काॅंक्रिट त्याला चिकटल्याने सरफेस उखडल्याचे कारण त्यांनी सांगितले. यानंतर ठेकेदाराला प्रतिनिधीने फोटो व्हाॅटसप केले असता नंतर त्याची बोलती बंद झाली.