Duct
Duct Tenderanama
मराठवाडा

BSNL : अधिकाऱ्यांना केबलडक्ट काही दिसेना! सर्व्हेक्षण नाही अन् कंत्राटदाराकडून कामही नाही

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : दोन आठवड्याचा काळ लोटला   तरी छत्रपती संभाजीनगरातील विविध वर्दळीच्या मार्गावर बीएसएनएलचे केबल डक्ट जैसे थे आहेत. 'टेंडरनामा' च्या वृत्तानंतर अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत हे उघडे केबल डक्ट ढापे टाकून सुरक्षित केले जातील, यासाठी आम्ही सर्वच रस्त्यांचे सर्वेक्षण करू, अंदाजपत्रक तयार करून वरिष्ठांच्या मंजुरीनंतर कंत्राटदाराकडून कामे करून घेतली जातील, असे आश्वासन बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र केवळ एका ठिकाणी ढापा टाकून केबल डक्ट सुरक्षित केल्याचे दाखवत अधिकाऱ्यांनी दिशाभूल केल्याचा प्रकार समोर आला आहे.

उर्वरित केबल डक्ट तसेच असुरक्षित असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. ही स्थिती पाहता अधिकाऱ्यांना असुरक्षित केबल डक्ट काही दिसेना असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली असून, सुस्त प्रशासन कधी जागे होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शहरातील कॅम्ब्रीज नाका ते नगरनाका, सिडको ते हर्सुल टी पाॅईंट सर्व्हीसरोड, क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन रोड, जकातनाका ते टीव्हीसेंटर व अन्य मध्यवर्ती भागातील बीएसएनएलसह इतर खाजगी केबल कंपन्यांच्या केबल डक्टवरील ढापे उखडलेले असल्याने वाहनधारक व पादचाऱ्यांसाठी असुरक्षित झाली आहेत. विशेषत: बीएसएनएलसह इतर खाजगी कंपन्यामार्फत वार्षिक देखभाल व दुरुस्तीसाठी टेंडर काढून कंत्राटदाराची देखील नेमणूक केली जाते. मात्र शहरातील असुरक्षित केबल डक्ट पाहता केवळ कागदोपत्री कंत्राटदारांची नियुक्ती करून पैसा उचलून दिशाभूल केली जाते की काय, असा संशय बळावत आहे.

छत्रपती संभाजीनगरकरांकडून मृत्यूचे महामार्ग पाहत संबंधित प्रशासनावर टीका केली जात असताना अधिकारी असुरक्षित केबल डक्टची स्थिती सुधारण्यात अपयशी ठरले आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

यासंदर्भात बीएसएनएलच्या अखत्यारीत असुरक्षित केबल डक्ट संदर्भात सिव्हील डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी यापुर्वी रस्त्यावरील असुरक्षित केबल डक्टची पाहणी केली आहे. असुरक्षित केबल डक्टवर ढापे योग्य पध्दतीने न टाकल्यास, तसे दर्जेदार न केल्यास कंत्राटदारांवर कारवाई करू, असे आश्वासन दिले होते. मात्र त्याची कुठेही पूर्तता झालेली दिसून आली नाही.

दोन आठवड्याचा कालावधी उलटून देखील असुरक्षित केबल डक्टची स्थिती सुधारलेली नाही. कंत्राटदार काम करण्याऐवजी प्रतिनिधीलाच असुरक्षित केबल डक्ट कोठे आहेत, असे म्हणत पत्ते विचारत आहेत. यावरून अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला सूचना केल्या नसल्याचे उघड होत आहे. रस्त्याच्या कडेलाच या उघड्या केबल डंक्टमुळे नागरीकांना गंभीर दुखापतीची, त्यात पाणी व कचरा साचण्याची या समस्या उदभवत आहेत.