Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

Aurangabad : अखेर महमूद दरवाजाचे रूपडे पालटले

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : गेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या औरंगाबादेतील पानचक्कीजवळील ऐतिहासिक महमूद दरवाजाचे रूपडे पालटले असून येत्या २० फेब्रुवारीपर्यंत मेहमुद दरवाजाचे काम पुर्ण होणार आहे. त्यानंतर फक्त हलक्या व अत्यावश्यक सेवांसाठीच दरवाजातुन वाहतुक खुली केली जाणार आहे.

अवजड वाहने खालुन जाऊ नये, यासाठी खास बेरिकेड्स लावली जाणार आहेत. ऐतिहासिक काळातीलच लुक पुन्हा देणाऱ्या या दरवाजावर जी-२० परिषदेनिमित्त लवकरच आकर्षक  विद्युत रोषणाईने तो उजळणार आहे. गेल्या कित्येक वर्षात अनेक अपघातांनी निखळलेल्या या ऐतिहासिक वारसाच्या दुरूस्तीसाठी तत्कालीन मनपा प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ विद्यमान जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मनपा तिजोरीत दुरूस्तीसाठी पुरेसा निधी नसताना स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत निधी उपलब्ध केला त्यांच्यामुळेच हा ऐतिहासिक वारसा औरंगाबादकरांसमोर पुन्हा जशाचा तसा उभा राहीला.

नव्या आयुक्तांची मिळाली जोड

नवनिर्वाचित प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी देखील पाण्डेय यांच्या काळातील हे काम पुर्ण केले आणि खऱ्या अर्थाने या जखमी दरवाजाचे भाग्य उजळले. आता अशाच पद्धतीने इतर ऐतिहासिक दरवाजांचे संवर्धन केल्यास औरंगाबादच्या ऐतिहासिक पर्यटननगरीचे नाव सातासमुद्रापलिकडे उंचावेल, अशी आशा औरंगाबादकर व्यक्त करत आहेत. मुसळधार पावसाळ्यात पानचक्कीजवळील ऐतिहासिक मेहमूद दरवाजाची एक बाजू निखळल्याची घटना ९ जुलै २०२१ रोजी घडली होती. यापुर्वी २१ जून २०१८ झालेल्या अतिवृष्टीत एका अवजड वाहनाने धडक दिल्याने याच दरवाजाचे  दक्षिणेकडील एक कवाड निखळले होते. दरम्यान शहरातील पर्यटकप्रेमींकडून या दरवाजाची दुरूस्तीची मागणी पुढे आली. मात्र निधीच्या कमतरतेमुळे दुरूस्ती करण्याऐवजी मनपा कारभार्यांनी दरवाजातून वाहतूक सुरळीत होण्यासाठी लोखंडी अँगल बसविले होते. या लोखंडी अँगलमुळे अवघ्या तीन वर्षांतच दरवाजाचा एक भागच पूर्णपणे कोसळण्याच्या अवस्थेत पाेहोचला आहे. मनपा कारभाऱ्यांच्या या जुगाडू कारभारामुळे इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसह औरंगाबादकरांनी कारभाऱ्यांच्या अशा नियोजनशुन्य कारभाराबाबत मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट पसरली होती.

४०० वर्षांपेक्षा अधिक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या महमूद दरवाजाच्या दुरूस्तीकडे निधी नसल्याचे कारण सातत्याने पुढे केल्याने दरवाजाच्या काही भागातील दगड निखळण्यास सुरुवात झाली होती. पावसाळ्यात दगड निखळण्याचे प्रमाण अधिक होत होते. त्यामुळे आता हा ऐतिहासिक ठेवा फार काळ तग धरणार नाही, अशी चिंता इतिहासप्रेमींनी व्यक्त केली होती. महमूद दरवाजा शहर पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येतो. या दरवाजाचा समावेश राज्य, केंद्र पुरातत्व विभागाच्या स्मारकांमध्ये होत नाही. त्यामुळे या दरवाजाची दुरुस्ती आणि देखभाल करण्याचे काम मनपा प्रशासनाकडे येत असल्याचे म्हणत पुरातत्त्व विभागांनी जबाबदारी झटकली होती. दुसरीकडे मनपा प्रशासनातील कारभाऱ्यांनी या ऐतिहासिक दरवाजाच्या दुरुस्तीकडे कधी गांभीर्याने पाहिलेच नाही. विशेष म्हणजे शहरातील विविध दरवाजांसह इतर ऐतिहासिक वस्तूंची देखभाल करण्यासाठी नेमलेली समिती देखील बरखास्त झाल्याने या ऐतिहासिक वारशाला कुणी वालीच उरले नव्हते. ही हेरिटेज समिती अस्तित्वात असताना कधी ऐतिहासिक वारशांच्या जतन व संवर्धनाबाबत कधी बैठका झाल्याचे मनपाच्या लेखी नव्हते.

मुळात मनपा कारभाऱ्यांना हा दरवाजा दुरुस्त करायचाच नाही, असा आरोप करत राज्य पुरातत्व समितीच्या काही माजी सदस्यांनी महमूद दरवाजाची फुटकळ पैशासाठी तात्पुरती डागडुजी करीत वास्तूचा बळी देण्यात येत असल्याचे सांगत दरवाजा धोकादायक घोषित करून त्याला पाडतील आणि रस्ता रुंद करून विकास साधतील, असा आरोपही केला होता. त्यात काहींनी महमूद दरवाजाच्या बाजूने पर्यायी रस्ता करण्याची मागणी केली होती. त्यात दरवाजाच्या दोन्ही बाजुला झालेले अतिक्रमण काढून दरवाजा मध्यभागी घेऊन मार्ग काढला पाहिजे. यासाठी मनपा प्रशासनाला उपाय सुचविले होते.

आस्तिककुमार पांण्डेय यांनी केला ॲक्शन प्लॅन

इतिहास प्रेमींनी एकत्र येत दरवाजाच्या संवर्धनासाठी मनपा प्रशासनाची भूमिका महत्त्वाची आहे, त्यांनी तत्काळ पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी करत तत्कालीन मनपा प्रशासक आस्तिकुमार पांण्डेय यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच पाण्डेय यांनी तातडीने महमूद दरवाजा वाचविण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार केला होता.

तपासल्या कायद्यातील तरतुदी

महाराष्ट्राच्या टाऊन ॲण्ड कंट्री प्लॅनिंग ॲक्टमध्ये शहराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी वेगवेगळ्या व्याख्या दिल्या आहेत. याच कायद्यात १३ ए आणि १३ बी मध्ये वारस म्हणजे काय, याची व्याख्या त्यांनी तपासली. या कायद्यानुसार त्यांनी शहर वारसा स्थळांची यादी तपासली. त्यात महमूद दरवाजाचा समावेश असल्याचे दिसून आले.

पाण्डेय यांचा संवर्धनासाठी पुढाकार

पाण्डेय यांनी महमूद दरवाजासह इतर ऐतिहासिक वारसा स्थळाच्या दुरूस्तीबाबत पुढाकार घेतला. ४०० वर्षापूर्वीचा वारसा जपणारी ऐतिहासिक दरवाजे,  तटबंदी यांची दुरूस्ती केली. यासाठी जवळपास तीन कोटीचा खर्च केला. दरवाजांसह तटबंदीची लिपापोती करून रंगरंगोटी आणि त्यावर विद्युत रोषणाईचा साज चढवला. गेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्षित असलेला शहागंज येथील मनोरा आणि त्यावरील धुळखात बंद पडलेली ऐतिहासिक घड्याळाची टिकटिक देखील त्यांनी सुरू केली.एवढेच नव्हे, तर क्रांतीचौक उड्डाणपुलाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दोन्ही बाजुने शिवाजी महाराजांचे पुराण वस्तुसंग्रहालयाचे खास काम त्यांनी हाती घेत यावर तीन कोटीचा खर्च केला जात आहे. हे काम देखील अंतिम टप्प्यात आहे.

असे केले महमूद महमूद दरवाजाचे संवर्धन

इतिहासप्रेमींच्या मागणीनंतर पाण्डेय यांनी महमूद दरवाजाच्या दुरूस्तीकडे विशेष लक्ष दिले. यासाठी स्मार्ट सिटी बोर्डाकडे प्रस्ताव पाठवला. त्यात निधीला मंजुरी मिळवली. स्मार्ट सिटी प्रकल्पातून जवळपास ३२ लाख रूपये खर्चाची मुभा मिळाल्यानंतर स्मार्ट सिटी प्रशासनामार्फत निविदा काढल्या.ऐतिहासिक वारसा स्थळांच्या दुरूस्तीचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या राजस्थान येथील मुळनिवासी काझी सिराजउद्दीन कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले. त्यावर नंदादीप फाऊंडेशनचे महेश वर्मा यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली. तांत्रिक सल्लागार म्हणून तपासणीसाठी खास आयआयटीची नेमणूक केली.

जुन्याच पद्धतीने केली लिपापोती

गेल्या ४०० वर्षाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या महमूद दरवाजाच्या दुरूस्तीसाठी राजस्थान, नेवासा, छत्तीसगड आणि ग्वाल्हेर येथील कुशल कामगारांचा हात लागला. गेल्या वर्षभरापासून दिवसरात्र दरवाजा दुरूस्तीचे काम सुरू होते. निखळलेल्या दगडांच्या जागी नवीन दगड जशास तसे बसवण्यासाठी खास नेवासाहुन आणले. जुन्या काळात वापरलेल्या बारीक विटा लावण्यासाठी खास गुजरात मधील गोध्रा येथुन खरेदी करण्यात आल्या. कर्नाटकातुन चुना आणला.

बांधकामात फक्त विटा, चुना अन् दगडांचा वापर

विटांचीच माती आणि विटांची खडी आणि फक्त चुन्याचा वापर करून या दरवाजाची लिपापोती करण्यात आली आहे. मुख्य रस्त्यापासून २० फुट उंच आणि पाच मीटर लांबीचा स्लॅबचे बांधकाम बारीक विटांमधुनच करण्यात आले आहे. विशेष म्हणजे चारशे वर्षापूर्वीचे दोन्ही बाजुच्या कवाडांची जशास तशी दुरूस्ती करण्यात आली असून, त्यांच्या नेहमीच्या जागेवर ते बसवले जाणार आहेत. दरवाजा दुरूस्ती दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून गेल्या वर्षापासून दरवाजा बंद ठेवण्यात आला होता.

दुरूस्ती नवी पण लुक 'तोच'

जुन्याच काळातील बांधकामाची कला वापरल्यामुळे या दरवाजाला ऐतिहासिक लुक प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. आता विटांची माती आणि चुन्याचा मुलामा तयार करताना दरवाजाचे जतन व संवर्धन मजबुत करण्यासाठी त्यात गुळ, मेथी, गुगुळ, डिंक, दालचिनी, सुंठ, काळिमीरी, लवंग, विलायची व इतर अन्य मसाल्याचे मिश्रण तयार करून रंग तयार केला जात आहे. या रंगरंगोटीनंतर दरवाजाला ऐतिहासिक काळातीलच लुक प्राप्त होणार आहे.  दरवाजाच्या लिपापोतीसाठी कुठल्याही मशिनरीचा वापर न करता लाकडी घाण्यातूनच सगळे बांधकाम तयार केले आहे.

असा आहे सुरक्षेचा उपाय

आता या ऐतिहासिक वारसास्थळाळे जतन व संवर्धन व्हावे,  जड वाहनांच्या व्हायब्रेशनमुळे दरवाजा दुरूस्तीच्या कामाचा पुन्हा खिळखिळा होऊ नये, यासाठी केवळ दुचाकी व चारचाकी व रूग्णवाहिंकांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. जड वाहने जाऊ नयेत, यासाठी दरवाजाच्या स्लॅबपासून खाली ३ मीटरचे हाईट बेरिअर लावले जाणार आहेत.