Aurangabad: 'या' रस्त्याने का घातली औरंगाबादकरांना भुरळ?

Bibi Ka Makbara : देश-विदेशातील पर्यटकांनाही सुखद धक्का
Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले नागसेनवन परिसरातील पाणचक्की, बिबी का मकबरा (Bibi Ka Makbara) आणि औरंगाबाद लेणी, तसेच विद्यापीठ (BAMU) परिसरातील सोनेरीमहल (Soneri Mahal) या जागतिक पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या चकचकीत रस्त्यांनी औरंगाबादकरांसह देश-विदेशातील पर्यटकांना भुरळ घातली असून, दरमहा किमान दीड ते दोन लाख पर्यटकांची खाच-खळग्यातून मुक्तता झाली आहे.

Aurangabad
Aurangabad: हर्सूल रस्ता रुंदीकरणात खोडा; कोणी केली कोंडी?

त्यात महानगरपालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून स्मार्ट सिटीबस सारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सोय केल्याने पर्यटकांची खाजगी टॅक्सी व रिक्षाचालकांकडून वारेमाप भाडेवसुलीच्या जाचातूनही सुटका झाली आहे. त्यामुळे या प्राचीन पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे. याचे सर्वश्रेय कार्यकुशल कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांना दिले जात आहे. तशी शहरभर चर्चा देखील सुरू आहे. प्रत्यक्षात 'टेंडरनामा'च्या पाहणीत देखील तशी वस्तुस्थिती दिसून आली. त्याचा हा खास ग्राऊंड रिपोर्ट...

वेरूळ-अजिंठा लेणीप्रमाणेच औरंगाबाद लेणी पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. सहाव्या ते आठव्या शतकात बसाल्ट डोंगरात ही लेणी घडवली आहे. वेरूळ लेणीची प्रतिकृती म्हणूनही विदेशी पर्यटक औरंगाबाद लेणी पाहतात. मात्र पर्यटन हंगामातही लेणी परिसरात शुकशुकाट दिसत असे.

बिबी का मकबरा, पाणचक्की, सिद्धार्थ उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, वेरूळ लेणी, अजिंठा लेणी या पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होते. मात्र औरंगाबाद लेणी पाहण्यासाठी जेमतेम पर्यटक जात असत. बिबी का मकबऱ्यापासून लेणी जवळ आहे. शिवाय या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि सोनेरी महल आहे. तरीसुद्धा मोजकेच पर्यटक लेणी पाहण्यासाठी जात असत. 

Aurangabad
Nagpur : म्हाडाच्या वसाहतींची दुरावस्था; कधीही होऊ शकते अपघात

यापूर्वी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव आणि रस्त्याची दुर्दशा असल्यामुळे पर्यटक औरंगाबाद लेणींकडे पाठ दाखवत असत. परिणामी मकबरा परिसरात लेणीचा माहितीफलक केवळ शोभा ठरत होता. पर्यटकांना लेणीपर्यंत जाण्यासाठी रिक्षाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यात रस्ताही धड नसल्याने परराज्यातील आणि विदेशी पर्यटकांकडून रिक्षाचालक दोनशे ते पाचशे रुपये भाडे वसूल करत असत. औरंगाबादचे रिक्षाचालक मीटरनुसार भाडे आकारत नसल्याची पर्यटकांची सतत ओरड राहत असे. मुजोर रिक्षाचालकांची मुजोरी आणि खड्ड्यात हरवलेली पर्यटननगरी अशी देश-विदेशात औरंगाबादची नाचक्की होत असे.

येथील अनुभव अनेक पर्यटक मायदेशी व्यक्त करत असत. एकीकडे बंद स्वच्छतागृह, दुसरीकडे खडकाळ रस्ता अन् रिक्षाचालकांच्या अरेरावीमुळे पर्यटक लेणी पाहणे टाळत असत.  तक्रारींचा पाढा वाचल्यानंतरही पुरातन खाते वाहतूक व्यवस्थेबाबत परिवहन आणि मनपाकडे बोट दाखवत असे, तर रस्ते दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरत असे.

ज्युबली पार्क ते मेहमूद दरवाजा, मिल क्वार्नर ते बारापुल्ला रस्ता, विद्यापीठ गेट ते सोनेरी महल, बिबी का मकबरा ते औरंगाबाद लेणी, टाउन हाॅल ते मकई रस्ता प्रचंड खराब झाला होता. वाहनचालकांना कसरत करावी लागत असे. विदेशी पर्यटकांप्रमाणे स्थानिक नागरिकांचीही पर्यटनस्थळांकडे वर्दळ घटली होती.

त्यात औरंगाबाद लेणीकडे जाण्यासाठी खड्ड्यात रस्ता की, रस्त्यात भगदाडे अशी अवस्था झाल्याने पर्यटन हंगाम तेजीत असताना देखील पर्यटकांविना औरंगाबाद लेणी परिसरात शुकशुकाट दिसत असे. परिणामी पर्यटन व्यवसायावर देखील मोठा परिणाम झाला होता.

Aurangabad
Tender : सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी गुड न्यूज; 75 लाखांची..

जपान आणि चीन या दोन देशातील बहुतेक पर्यटक औरंगाबाद लेणी आवर्जून पाहतात. बौद्ध कलाकृती अनुभवण्यावर त्यांचा भर असतो; मात्र लेणीपर्यंत पोहचण्यासाठी या पर्यटकांना गैरसोय सहन करावी लागत असे. शिवाय अैरंगाबाद लेणीच्या पायथ्याशी प्रत्येक धम्मचक्र अनुपरिर्वन दिनानिमित्त मोठा उत्सव भरतो. इतर पर्यटकांनाही लेणीकडे वळवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे पर्यटनप्रेमींकडून पुरातत्व खात्यासह मनपाला जपानी व चीनचे पर्यटक सांगत असत.

सुसज्ज व्यवस्था पण गैरसोय

केंद्रीय पुरातत्त्व विभागाने मागील काही वर्षात औरंगाबाद लेणी परिसरात जतन व संवर्धनाचे काम केले. पर्यटकांना थेट लेणीपर्यंत जाण्यासाठी विस्तीर्ण दगडी पायऱ्या बांधण्यात आल्या. पूल, संरक्षक कठडे आणि माहिती फलक लावले आहेत. परिसरात भरपूर झाडी असून संरक्षणासाठी पोलिस चौकी आहे. या सुविधा असूनही केवळ पाणी टंचाईमुळे बंद स्वच्छतागृह, खडबडीत रस्त्याचा प्रश्न कायम असल्याने व  वाहतूक व्यवस्थेअभावी या पर्यटनस्थळाची रया गेली होती.

प्रकरण न्यायालयात : सां.बां.विभागाची दुरूस्ती

या अत्यंत खराब रस्त्यांबाबत २०१६ मध्ये पहाडसिंगपुऱ्यातील परेश बदनपुरे या पर्यावरणप्रेमीने  ॲड. रूपेश जैस्वाल यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. मकबरा ते औरंगाबाद लेणी रस्ता १९९२ मध्ये विकास आराखड्यात मंजूर झाला, मात्र तब्बल बारा वर्षांपासून रस्त्याचे रुंदीकरण झाले नाही.

मकबरा ते औरंगाबाद लेणी हा २४ मीटर रस्ता अपेक्षित असताना, सध्या केवळ सहा मीटरचा असून, रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत, रस्त्यात अनेक अनधिकृत बांधकामे आहेत, असे मुद्दे त्यांनी न्यायालयात उपस्थित केले होते. 

Aurangabad
Nashik ZP : काम न करताच काढले रस्त्याचे बिल

...आणि यंत्रणा जागी झाली

प्रकरण न्यायालयात गेल्याचा सुगावा लागताच मकबरा ते औरंगाबाद लेणी या प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ४२ या अडीच किमी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २०१५-१६ या आर्थिक वर्षात बी - १ टेंडर काढण्यात आले होते. त्यात यशस्वी झालेल्या औरंगाबादच्या सी.एन.ए. इन्फ्रास्ट्रक्चर्स या भागीदार संस्थेला ३ ऑगस्ट २०१५ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली होती. यात एक कोटी ९० लाख ५० हजार ४ रूपये शासनाच्या ५०५४ - ०४ या हेडखाली नाबार्डमधून मंजूर करण्यात आले होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कामाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र कंत्राटदाराने डांबरटपणाने केलेल्या या डांबरीकामाने थोडीही तग धरली नाही. त्यानंतर निधीचे रडणागे गात या रस्त्याकडे यंत्रणेने दुर्लक्ष केले.

कार्यकारी अभियंता येरेकर धावले

अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी शहरातील नागसेनवन परिसरातील मिल क्वार्नर ते बारापुल्लागेट - लिटील फ्लाॅवर स्कूल ते विद्यापीठ गेट ते मकई गेट, तसेच बिबी का मकबरा ते औरंगाबाद लेणी, ज्युबली पार्क ते पानचक्की या रस्त्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा केला. २० कोटींचा प्रस्ताव पाठवला. खा. इम्तियाज जलिल आणि औरंगाबादमध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी देखील पाठपुरावा केला.

त्यातूनच पर्यटनस्थळांकडे जाणारे हे रस्ते चकाचक झाले. एवढेच नव्हे, तर या रस्त्यांनी  पर्यटकांनी भुरळ घातली असून, खड्डेविरहीत रस्त्यांची वार्ता जगभर पसरत असल्याने आता पर्यटकांची संख्या देखील वाढत आहे. कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत औरंगाबादकर त्यांचे सर्वत्र कौतुक देखील करत आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com