Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

Aurangabad : पाहुण्यांच्या दौऱ्यापूर्वी उड्डाणपूल, दुभाजक चकाचक

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : शहरात विदेशी पाहुणे येणार म्हणून सर्व यंत्रणा कशा कामाला लागल्या. G-20 निमित्त विदेशी पाहुण्यांचा औरंगाबादेत दौरा असल्याने व दोन दिवस मुक्काम असल्याने यंत्रणा गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून डोळ्यात तेल घालुन दिवस-रात्र झटत आहेत. विदेशी पाहुणे औरंगाबादेतून ज्या मार्गावरून ये-जा करणार तेथे मोठ्या प्रमाणावर शहरात स्वच्छता करण्यात येत आहे. विशेष म्हणजे गेल्या दशकापासून दशावतार झालेल्या रस्ते, दुभाजक, उड्डाणपुलांचे आणि विद्युतखांबांसह वाहतूक सिग्नलांचे नशीब उजळले असून, यात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेने पुढाकार घेत तू-तू, मै-मै न करता अन् हद्दीचा वाद न घालता एकमेका सहाय्य करू, साथी हाथ बढाना... या गीतांचा बोध घेत एका सुरात विकासकामांचा धडाका लावला आहे.

२६ ते २७ फेब्रुवारी दरम्यान विदेशी पाहुण्यांचे शिष्टमंडळ औरंगाबादेत येणार असल्याने रस्ते, उड्डाणपुल चकाचक करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अचानक शहरात हा कायापालट होत असताना औरंगाबादकरांच्या भुवया उंचावल्या आहेत. ज्या ठिकाणी विकासकामे झाली आहेत. अशा ठिकाणी सुशोभिकरणाजवळ सेल्फी काढण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.

जी-20 परिषद २०२३ च अध्यक्षपद भारताकडे असल्यानं मराठवाड्याची ऐतिहासिक राजधानी  औरंगाबाद इथं विविध बैठका होणार आहेत. याचाच एक भाग म्हणून औरंगाबादेत २६ ते २७ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत विविध देशांचे प्रतिनिधी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महापालिका आयुक्त डाॅ. अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, रविंद्र निकम, पोलिस आयुक्त डाॅ. निखील गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकीर्डे, अधीक्षक अभियंता विवेक बडे, कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, उपअभियंता डी. एस. कांबळे, शाखा अभियंता अनिल होळकर, प्रीती मोरे, महापालिका शहर अभियंता ए. बी. देशमुख, कार्यकारी अभियंता भागवतराव फड (रस्ते व इमारती) कार्यकारी अभियंता राजीव संधा, उपअभियंता मोहिनी गायकवाड (विद्युत), उद्यान अधिक्षक डाॅ. विजयराव पाटील, उपायुक्त सोमनाथराव जाधव व सर्व प्रभाग अभियंते, प्रभाग अधिकारी व कर्मचारी आदींनी तयारीला वेग दिला आहे.

शहरातील सिद्धार्थ गार्डन, धूत हाॅस्पीटल, नेहरू उद्यान, स्वामी विवेकानंद उद्यान, सलीमअली सरोवर, जळगावरोड, पंचायतसमिती, दमडीमहल, जिल्हाधिकारी कार्यालय, रामगिरी चौक, जळगाव टी पाॅईंट उड्डाणपुल आदी ठिकाणी आकर्षक हौद बांधुन रंगीबेरंगी पाण्याचे फवारे आकाशात झेप घेताना दिसून येत आहेत. याशिवाय जालना रस्त्यावरील सिडको, सेव्हनहील, मोंढानाका, क्रांतीचौक, महावीरचौक, संग्रामनगर, टाउनहाॅल आदी उड्डाणपुलांसह भडकल गेट परिसर, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच विभागीय आयुक्तांच्या निवासस्थानासह कार्यालय , नेहरू उद्यान, राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तुसंग्रहालय, ज्युबलीपार्क परिसरातील विविध सरकारी भिंतींची डागडूजी करून त्यावर  रंगरंगोटी आणि चित्रशैलीसह इतर छायाचित्रे आकर्षक रंगसंगतीत दिसून येत आहेत. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी देखील चित्रशैली न्याहाळता यावी यासाठी खास दिवाबत्तीची सोय करण्यात आली आहे. विविध चौक आणि उड्डाणपुल महापुरूषांचे पुतळे आणि ऐतिहासिक दरवाजे व पर्यटक स्थळांवर आकर्षक विद्युत रोषणाई औरंगाबादकरांना आतापासूनच भुरळ घालत आहे. येथील छायाचित्रांसह, फाऊंटनमधील उडणारे फवारे, उड्डाणपुल आणि चकचकीत रस्त्यांसोबत औरंगाबादकरांची सेल्फी काढण्यासाठी झुंबड उडत असल्याचे दिसून येत आहे. 

विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी संबंधित प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगलीच  कंबर कसली असून, ते येणारे मार्ग अत्यंत सुव्यवस्थित आणि सुंदर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गेल्या काही वर्षांत विदेशी पर्यटक, उद्योजक, मराठी आणि हिंदी चित्रपटातील नामांकित अभिनेते, अभिनेत्री आणि डिग्गज पुढाऱ्यांनी औरंगाबाद शहराचा उल्लेख अत्यंत घाणेरडे आणि खड्डेमय तसेच नाल्यांच्या भयंकर दुर्गंधीचे तसेच वाहतूकीबाबत बेशिस्तांचे शहर म्हणून केला होता. तशी वेळ पुन्हा या ऐतिहासिक शहराच्या नशिबी येऊ नये यासाठी जोरदार तयारी करण्यात आली.

विदेशी पाहुण्यांच्या नजरेत औरंगाबाद शहर सुंदर दिसण्यासाठी महापालिका व सां. बां. विभागाने मोठा आटापिटा चालवला आहे. ते येणाऱ्या रस्ते देखील खड्डेमुक्त केले जात आहेत. यात विशेष म्हणजे सां. बां. विभागाच्या अखत्यारितील नगरनाका ते विमानतळ, सिडको बसस्थानक ते हर्सुल टी पाॅईंट, नगरनाका ते दौलताबाद टी पाॅईंट, महावीर चौक ते हर्सुल टी पाॅईंट या रस्त्यांचे नशीब उजळले असून दिवसरात्र दर्जात्मक दर्जोन्नतीचे काम सुरू असून त्या रस्त्यांची सजावटही केली जात आहे. रस्त्यांमध्ये आयआरसीच्या नियमाप्रमाणे थर्मापेस्ट पांढरे पट्टे, झेब्रा क्राॅसींग, किटकॅट ऑईज, दुभाजकांची वाहतूक नियमाप्रमाणे रंगरंगोटी, दिशादर्शक फलकांची दुरूस्ती, साफसफाई, रंगरंगोटी केली जात आहे.

रस्त्यांच्या दोन्ही बाजूला तसेच दुभाजकालगत रानटी झाडेझुडपे, गाजरगवत काढून फवारणी सुद्धा करण्यात आली. महापालिकेने देखील मिल कॉर्नर ते बारापुल्ला गेट, ज्युबलीपार्क ते टाऊनहाॅल, ते जिल्हाधिकारी निवासस्थान, रंगीन दरवाजा ते दिल्लीगेट ते हर्सुल टी पाॅईंट , महावीर चौक ते मिल कॉर्नर ते छावनी ते विद्यापीठ ते मकाईगेट ते टाउनहाॅल , मकाई गेट ते बिबिका मकबरा आदी रस्त्यांचे  काम हाती घेतले आहे. विमानतळ ते महावीर चौक ते हर्सुल टी पाॅईंट , सिडको टी पाॅईंट ते हर्सुल टी पाॅईंट ते भडकल गेट आदी रस्त्यांवरील पथदिवे, वाहतूक सिंग्नलची दुरूस्ती अन् रंगरगोटी युध्दपातळीवर सुरू आहे. त्याचबरोबर सुभेदारी विश्रामगृहातील आत-बाहेरचे रस्ते, इमारतीतील प्रत्येक खोल्यांची दुरूस्ती, विद्युतीकरण, रंगरंगोटी युद्धपातळीवर सुरू आहे, अशीच कामे महापालिका, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयांचे नुतनीकरण देखील युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे रोज विदेशी पाहुण्यांचे दौरे शहरात झाले तर शहर किती सुंदर दिसेल अशा उपरोधिक भावना औरंगाबादकर व्यक्त करत आहेत.