Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

Aurangabad : अखेर 'तो' रस्ता झाला चकाचक; फुटपाथचे काम सुरू

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : सिडको एन-३ या भागातील या रस्त्याच्या शेजारी उच्च न्यायालयातील नामांकीत वकील, उद्योजक, व्यापारी व बड्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने पण आधीच खड्ड्यांमुळे झालेली रस्त्याची मोठी दुरवस्था त्यात धुळीच्या त्रासाने येथील रहिवाशांना छळले होते. सगळीकडे कैफियत मांडून थकलेल्या रहिवाशांनी अखेल 'टेंडरनामा'कडे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी लावून धरण्याबाबत विनंती केली होती. याबाबत ‘टेंडरनामा ’ प्रतिनिधीने प्रत्यक्षात येथील रहिवाशांसोबत रस्त्याची पाहणी केली होती. त्यावर अनेकवेळा वृत्त प्रकाशित केले होते.

सिडकोतील एन-३ परिसरातील उच्च न्यायालय ते शिवछत्रपती महाविद्यालय या ५०० मीटर रस्त्याचे काम सिडकोचे मनपात हस्तांतर झाल्यापासून गेल्या पंधरा वर्षांपासून झालेच नव्हते. याउलट हा एक रस्ता वगळता आसपासचे बहुतांश रस्ते सिमेंटचे झाले आहेत. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी मनपाकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर देखील निधी नसल्याचे तेच ते कारण पुढे करत मनपा प्रशासनातील कारभारी वेळ मारून नेत होते. मागेपुढे काँक्रिटचे रस्ते आणि मध्येच हा खोलगट, खड्डेमय रस्त्याची बिकट वाट सर करताना नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागत.

तत्कालीन प्रशासकांकडून दखल

या वृत्त मालिकेची दखल घेऊन तत्कालीन मनपा प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांनी तातडीने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रस्ता दुरूस्तीसाठी समावेश केला. संबंधित कंत्राटदार ए. जी. कन्सट्रक्शन यांनी तातडीने रस्त्याचे काम सुरू केले. मात्र सिमेंट रस्त्याचे काम झाल्यावर गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्याच्या दोन्ही कडेला फुटपाथचे काम न करताच कंत्राटदार ए. जी. कन्सट्रक्शन कंपनीने यंत्रणा पसार केली होती. याकडे यश इनोव्हेशन ॲन्ड सोल्युशन या कंन्सलटंटसह आयआयटी या तांत्रिक समितीचे देखील दुर्लक्ष होते.

चकचकीत रस्त्यावर क्युरींगसाठी आणलेल्या गोणपाटाचे ढिग, अस्ताव्यस्त पसरलेली खडी अन् जोड रस्त्यांवर टाकलेल्या डेब्रिजचे ढिग, त्यात फुटपाथ न केल्याने दोन्ही बाजुने या खड्ड्यांमुळे नव्याकोऱ्या सिमेंट रस्त्यावर वाहन पार्किंगमधून आणणे अवघड झाले  होते. याच कारणाने  रस्त्यावर दररोज लहान-मोठे अपघात घडत असत. या रस्त्यावरच पार्किंग झाल्याने अनेकांची फजिती होत असे, तातडीने फुटपाथ करण्याची मागणी नागरिकांनी संबंधित विभागाला केली होती; परंतु संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले गेले. याबाबत ‘टेंडरनामा’ने पुन्हा वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन कंत्राटदार, प्रकल्प व्यवस्थापकांसह स्मार्ट सिटीचे कारभारी सुतासारखे सरळ झाले. अखेर या रस्त्याच्या दोन्ही कडेला फुटपाथ उभारणीचे काम काम हाती घेतले आहे. सध्या फुटपाथच्या कामाला सुरुवात झाली असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.