Aurangabad, Panchakki
Aurangabad, Panchakki Tendernama
मराठवाडा

G-20 बैठकीच्या धुमधडाक्यात पाणचक्की दुर्लक्षित; निधी जातो कुठे?

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : शहरातील एक मुख्य आणि आकर्षण स्थळ असलेल्या पाणचक्कीकडे G-20 च्या धुमधडाक्यात दुर्लक्ष झाल्याचे 'टेंडरनामा'च्या पाहणीत उघड झाले आहे. पर्यटकांच्या तक्रारीनंतर प्रतिनिधीने गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास तब्बल तीन तास पाहणी केली असता येथील अस्वच्छता पाहून देशी-विदेशी पर्यटक नाकावर रुमाल ठेऊन पाणचक्कीची कौशल्यपूर्ण रचना न्याहाळत असल्याचे दिसून आले.

बारमाही पाण्याच्या प्रवाहाला गती देत वाहवत ठेवणाऱ्या मोठे लोखंडी पाते आणि दगडी जाते ठेवलेल्या खोलीकडे जाताना कचऱ्याचे ढीग आणि वेढलेल्या गाजरगवतातून वाट काढत आत प्रवेश करावा लागतो. हौदातील जलाशयाच्या काठावर प्लास्टीक पिशव्या अन् गुटख्याच्या पुड्या गटांगळ्या खाताना दिसतात.

पाणचक्कीत प्रवेश करण्याआधी दर्शनीभागातच बेरंग झालेल्या व पोपडे निघून खिंडारमय अवस्थेत असलेल्या भिंतीवर केलेली पोस्टरबाजी पाणचक्कीची शोभा घालवत असल्याचे दिसते. महमूद दरवाजाचे काम चालू असल्याने प्रवेश बंद असला, तरी नागसेनवन परिसरातील पी.ई.एस. अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून चकचकीत काॅंक्रिट रस्त्याने पाणचक्कीकडे प्रवेश करता येतो. मात्र दोन्ही बाजूने वाहनांच्या अतिक्रमणातून वाट काढताना पर्यटकांना तारेवरची कसरत करावी लागते.

वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था नसल्याने दिसेल तिथे मोकळ्या जागेत अस्ताव्यस्त वाहने पार्क केली जातात. प्रवेशद्वारातच कचरा विखुरलेला दिसतो. दरम्यान प्रवेशद्वारातील तिकीट खिडकीसमोरील रस्त्याची खिंडारमय अवस्था असल्याने महमूद दरवाजाचे काम होईपर्यंत तेथे मुरुमाची भरती करावी, अशी मागणी पर्यटक करताना दिसले.

पाणचक्कीतील उंचीवर असणाऱ्या जलकुंडाकडे पाहिल्यास त्याच्या भोवती वडपिंपळाची झाडे वाढल्याने भिंत आणि जलकुंडाला धोका होऊ शकतो. १६४ × ३१ फूट आकाराच्या जलाशयातील कारंजे देखील बंद असल्याचे दिसले. परिसरातील हजरत बाबाशहा मुसाफिर आणि हजरत बाबा अहमद सईद यांचे दर्गे, मस्जिद आणि सराईकडे स्वच्छता दिसून आली. ग्रंथालय परिसरात देखील अस्वच्छता दिसून आली.

एकीकडे जी - २० निमित्त विदेशी पाहुण्यांच्या ये - जा करणाऱ्या मार्गावर कमालीची स्वच्छता, कोट्यवधीची रंगरंगोटी अन् चकाचक रस्ते, विद्युत रोषणाई , सुशोभिकरण केले जात असताना औरंगाबाद शहराचे वैभव असलेल्या पाणचक्कीच्या दुरुस्ती आणि रंगरंगोटीसह स्वच्छतेकडे महाराष्ट्र वक्फ बोर्ड दुर्लक्ष का करत आहे. जी - २० साठी मनपा प्रशासनाला ५० कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागाला २० कोटीचा निधी मिळाला, मग वक्फ बोर्डाला त्यांच्या अखत्यारितील पर्यटन स्थळांसाठी निधी मिळाला नाही काय, जर मिळाला असेल तर तो खर्च का केला जात नाही, असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

यासंदर्भात पाणचक्कीतील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता मनपा प्रशासक व संबंधित अधिकाऱ्यांनी जी - २० च्या दरम्यान ईकडे फिरकले देखील नाहीत. कुठल्याही नियोजनात सहभागी केले नाही. आम्ही त्यांची वाट पाहत असल्याचे हास्यास्पद उत्तर येथील अधिकाऱ्यांनी देत वेळ मारून नेली.