Shivendrasingh Bhosale Tendernama
कोकण

गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर कोंडी नको; मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचे अधिकाऱ्यांना ‘On the spot’ निर्देश

नागोठणे उड्डाणपुलावरून छोट्या वाहनांची वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश; माणगाव-इंदापूर बायपास मुदतीत पूर्ण करण्याची सूचना, खारपाडा टोल स्थगित करण्याची आदिती तटकरे यांची मागणी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहावी, वाहतूक कोंडी होऊ नये तसेच गणेशभक्त आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले. नागोठणे उड्डाणपुलावरील वाहतूक, माणगाव व इंदापूर बायपासची कामे, सुविधा केंद्रे आणि पर्यायी मार्गांच्या नियोजनाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी महाड येथील शासकीय विश्रामगृहात मंत्री भोसले यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल तसेच सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

नागोठणे उड्डाणपुलावर नियमित निरीक्षण

गणेशोत्सव काळात नागोठणे उड्डाणपुलावरून छोट्या वाहनांची वाहतूक सुरळीत राहणे महत्त्वाचे असल्याचे भोसले यांनी सांगितले. वाहतुकीचा प्रवाह अबाधित राहावा आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्यक्ष परिस्थितीवर नियमित लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

वाहतुकीच्या स्थितीचे निरीक्षण करून गरजेनुसार तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच गणेशोत्सवाच्या दहा दिवसांतील वाहतूक व्यवस्थापनाचा दैनंदिन अहवाल सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माणगाव, इंदापूर बायपासला गती

पनवेल ते इंदापूर आणि इंदापूर ते झाराप या मार्गांवरील कामांचा आढावा घेताना माणगाव व इंदापूर बायपासची कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कामाचा दर्जा आणि गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर देखरेख करण्याचे निर्देशही भोसले यांनी दिले.

महामार्गाच्या कामांमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच वाहतुकीवर अनावश्यक परिणाम होऊ नये, यासाठी योग्य नियोजन करण्याचेही त्यांनी सांगितले.

महामार्गावर सुविधा केंद्रे

गणेशोत्सवात महामार्गावर मोठ्या संख्येने प्रवासी आणि वाहनांची ये-जा होणार असल्याने आवश्यक ठिकाणी सुविधा केंद्रे उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या. या केंद्रांवर स्वच्छता, वीज, पाणी आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच पुरेशा प्रमाणात चलत स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याचे निर्देश आहेत.

पर्यायी मार्गांचीही तयारी

महामार्गावरील वाहतुकीचा भार वाढल्यास वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गांची चाचपणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गरज पडल्यास अंतर्गत रस्त्यांचा वापर करता यावा, यासाठी त्यांची आवश्यक दुरुस्ती करून ते वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

खारपाडा टोल स्थगित करण्याची मागणी

दरम्यान, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत खारपाडा येथील टोल आकारणी स्थगित करण्याची मागणी मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून रस्ता दुभाजक, उड्डाणपूल आणि साईड पट्टीची कामे सुरू असल्याने काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. वाहतुकीसाठी अपेक्षित सुविधा पूर्ण झालेल्या नसताना खारपाडा येथे टोल आकारणी सुरू असल्याने कोकणवासीयांच्या भावनेचा आदर करून तो स्थगित करावा, अशी मागणी तटकरे यांनी केली आहे.

महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांना टोलमध्ये सवलत देण्याबाबतही विचार करावा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Key Points

  • गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्याचे निर्देश,

  • नागोठणे उड्डाणपुलावरून छोट्या वाहनांची वाहतूक सुरळीत करण्यावर भर,

  • माणगाव व इंदापूर बायपासची कामे मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना,

  • महामार्गावर सुविधा केंद्रे, वैद्यकीय सेवा आणि चलत स्वच्छतागृहांची व्यवस्था,

  • वाहतुकीचा भार वाढल्यास पर्यायी व अंतर्गत मार्गांचा वापर करण्याचे नियोजन,

  • महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत खारपाडा टोल स्थगित करण्याची आदिती तटकरे यांची मागणी.