मुंबई (Mumbai) : कोकण पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत असणाऱ्या प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येणार असून ज्याठिकाणी अडचणी आहेत, तेथे समन्वयाने मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सांगितले.
मंत्रालयीन दालनात कोकण पाटबंधारे विकास महामंडळाविषयी आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. जलसंपदा मंत्री महाजन यांनी म्हणाले की, अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे. सुरु असणाऱ्या प्रकल्पांना गती देण्यात यावी. कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी अधिकारी यांनी दक्ष रहावे. प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. मंत्री श्री महाजन यांनी महामंडळाच्या भविष्यकालीन प्रकल्पांचाही सविस्तर आढावा घेतला. यावेळी कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे प्रकल्पांविषयीचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले.
बैठकीला सचिव (लाक्षेवि) डॉ. संजय बेलसरे, कोकण पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, सहसचिव तथा मुख्य अभियंता अभय पाठक, संजीव टाटू, प्रसाद नार्वेकर, मिलिंद नाईक यांच्यासह महामंडळाचे व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, विदर्भातील सिंचन प्रकल्पअंतर्गत पूर्ण झालेल्या प्रकल्पातून जास्तीत जास्त प्रमाणात सिंचन क्षमता वाढवून कृषी सिंचन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असे निर्देश मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते.