Raigad Fort Tendernama
कोकण

रायगड किल्लासंवर्धन आराखड्याची अंमलबजावणी लवकरच; 600 कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : रायगड किल्ला संवर्धन व परिसराच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्याचा अभ्यास करून लवकरच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सांगितले.

रायगड किल्ला संवर्धन व परिसर विकास यासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. मंत्री ॲड. शेलार म्हणाले, रायगड विकास प्राधिकरणातर्फे ६०० कोटींचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार रायगड किल्ला व परिसराचा विकास करण्यात येणार आहे. याचा सखोल अभ्यास करून सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही ॲड.शेलार यांनी सांगितले.

तुळजापूरच्या भवानी मंदिराची कामे स्ट्रक्चरल ऑडिटनुसार-
तुळजापुरच्या भवानी माता मंदिराची स्ट्रक्चरल ऑडिटनुसार कामे ठरविण्यापुर्वी देवस्थानाचे पुजारी, तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट, स्थानिक आमदार यांच्यासोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पुरातत्व विभागामार्फत तुळजापुरच्या भवानी मातेचे मंदिर राज्य संरक्षित इमारत म्हणून घोषित करण्यात आले आहे. मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आला असून त्यानुसार पुढील कामाची दिशा निश्चित केली जाणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले. हा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. तसेच मंदिराच्या परिसरात सध्या दोन एजन्सीमार्फत दुरुस्ती आणि डागडुजीचे काम सुरु आहे. यामध्ये समन्वय साधून त्यांच्याकडून कालबद्ध नियोजन घेण्याचे निर्देश ॲड.शेलार यांनी दिले. यासंदर्भात सर्व संबंधित घटकांशी चर्चा करुन कामाची आखणी करण्यात येईल असेही ॲड शेलार यांनी सांगितले.