bridge Tendernama
कोकण

करंजा ते रेवस अर्ध्या तासात; 'ऍफकॉन्स' 3 वर्षात बांधणार 2 किलोमीटर पूल

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : उरण तालुक्यातील करंजा ते अलिबाग तालुक्यातील रेवस हे सागरी अंतर येत्या ३ वर्षात केवळ अर्ध्या तासात पार करता येणार आहे. सध्या रेवस-करंजा ७० किलोमीटर अंतर कापण्यासाठी दोन तासांचा अवधी लागतो. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उरण तालुक्यातील करंजा ते अलिबाग तालुक्यातील रेवस दरम्यानच्या दोन किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. 2963 कोटी रुपयांचे हे टेंडर 'अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर' कंपनीला मिळाले असून कंपनी पुढील ३ वर्षात हे काम पूर्ण करणार आहे.

मुंबईतील अटल सागरी सेतूमार्गे द्रोणागिरी नोड येथून या पुलावरून कोकणात प्रवास करता येणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत बॅ. ए. आर. अंतुले यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात या करंजा-रेवस पुलाच्या उभारणीसाठी कंबर कसली होती. सध्या रेवस-करंजा प्रवासासाठी वाहनधारकांना ७० किलोमीटर प्रवास रस्त्याने करावा लागतो. यासाठी दोन तासांचा अवधी लागतो, तर जलवाहतुकीसाठी दोन ठिकाणांदरम्यान १५ मिनिटे लागतात. पूल झाल्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी विविध कामांसाठी जाणाऱ्या उरण, पनवेल तालुक्यातील हजारो प्रवाशांचा खर्च व वेळेची बचत होणार आहे. उरण येथून अवघ्या ३० ते ३५ मिनिटांत अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण गाठता येणार आहे.

रायगड जिल्ह्यातील राज्य महामार्ग-४ (रेवस-रेड्डी कोस्टल हायवे) वरील या ४ लेन पुलामुळे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि अलिबागदरम्यानचे अंतर अंदाजे ५५ किलोमीटरवरून ३० किलोमीटरपर्यंत कमी होणार आहे. या पुलावरून तब्बल ८० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहने धावतील असे डिझाईन विकसित करण्यात येत आहे. पुलावर दोन्ही बाजूला १.५ मीटर रुंद पादचारी पदपथ समाविष्ट करण्यात आले आहेत. पुलाला जोडण्यासाठी करंजा येथे ५.१३ किलोमीटर लांबीचा; तर रेवस येथे १.७१ किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्यात येणार आहे.

करंजा-रेवस पुलामुळे अलिबाग थेट नवी मुंबई-मुंबईशी जोडले जाणार आहे. रेवस ते करंजा हा पूल दोन किमी लांबीचा असून, त्याच्या दोन्ही बाजूला तीन किमी लांबीचे मार्ग असतील. शिवडी आणि रायगडमधील न्हावा-शेवाला जोडणारी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक कार्यान्वित झाल्यानंतर, हा रेवस-करंजा पूल अलिबाग आणि मुरूडसह कोकणाकडे जाणाऱ्या पर्यटकांना खूप महत्त्वाचा ठरणार आहे. या पुलामुळे अलिबाग थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह जेएनपीटीला जोडले जाणार आहे.