Road Work (File) Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : ठेकेदार, अधिकाऱ्यांच्या हितसंबंधामुळेच रखडले 'त्या' रस्त्याचे काम

टेंडरनामा ब्युरो

पिंपळे गुरव (Pimpale Gurav) : गणेश नगर परिसरातील मुख्य रस्ता बँक ऑफ महाराष्ट्रसमोरून जातो. महापालिकेने या रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण केले असले तरी रस्त्याच्या कडेला पेव्हिंग ब्लॉक्सच्या पदपथाचे काम मागील दीड वर्षापासून प्रलंबित आहे. परिणामी, रस्त्याच्याकडेला खोल खड्डे निर्माण झाले असून, नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

मागील काही दिवसांत महापालिकेची कचरा संकलन करणारी गाडी दोन तास रस्त्यात या खड्ड्यांमध्ये अडकल्याची घटना घडली. यामुळे संपूर्ण रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आणि स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागला. अरुंद रस्ता आणि अर्धवट पडलेले काम यामुळे परिसरातील वाहनचालक व पादचाऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

नागरिकांमध्ये संताप

स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत ठेकेदार आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गणेशनगर रस्त्याचे काम ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या हितसंबंधामुळेच रखडले का? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. ‘जर काम रखडले असेल तर ठेकेदारावर दंड का ठोठावला जात नाही? असा आरोप नागरिकांनी लावला आहे.

अधिकाऱ्यांचे आश्वासन हवेतच

रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडले असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. दोन महिन्यांपूर्वी कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार यांनी, ‘रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच पदपथाचे काम सुरू करण्यात येईल व येत्या पंधरा दिवसांत रस्ता पूर्ण होईल,’ असे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. ना रस्ता पूर्ण झाला, ना पदपथाचे काम सुरू झाले. काम रखडण्याच्या कारणांबाबत कोणतीही ठोस माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासन आणि ठेकेदार यांच्यातील निष्काळजीपणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

‘रस्ता पूर्ण होताच पदपथाचे काम सुरू करू,’ असे दोन महिन्यांपूर्वी दिलेले आश्वासन अद्याप हवेतच असून, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार यांनी ‘तांत्रिक अडचणींमुळे काम रखडले, लवकरच काम पूर्ण करू, असे दिले होते.

नागरिकांची मागणी

तत्काळ रस्त्याच्या आणि पदपथाच्या कामाला गती द्यावी आणि पूर्णत्वाला नेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. अन्यथा, आंदोलनाचा इशाराही काही संघटनांनी दिला आहे.

‘‘युटीलिटी पाईप टाकणे, त्यावर जीएसबीच्या पसरविणेचे काम केले आहे. लवकरच पीसीसीचे काम सुरू करणार आहे. त्यानंतर ब्लॉक्स बसविण्यात येणार आहेत.

- प्रसाद देशमुख, उपअभियंता, स्थापत्य विभाग ‘ड’ प्रभाग

‘‘कधी रिक्षा पलटी होते. रस्ता पूर्ण न झाल्यामुळे स्कूटर मोटरसायकल पार्किंगसुद्धा रस्त्यावरच होतात. त्यामुळे यातायात अवघड झालेली आहे.

- ॲड. प्रताप साबळे, स्थानिक रहिवासी