मुंबई (Mumbai): औद्योगिक आणि व्यावसायिकदृष्ट्या ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर असलेल्या भिवंडीतील वाहतुकीचा प्रश्न उग्र झाला असून, त्यावर मार्ग काढण्यासाठी भिवंडी शहरासाठी मोबिलिटी आराखडा तयार करण्यात यावा, अशी मागणी भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली.
भिवंडीतील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार, खासदारांची नुकतीच ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्णा पांचाळ यांच्याकडे बैठक झाली. बैठकीत बोलताना आमदार शेख म्हणाले की, ठाणे -भिवंडी-वडपे आणि भिवंडी-वाडा-पालघर हे दोन्ही राष्ट्रीय महामार्ग शहरातून जातात. दोन वर्षांमध्ये एका रस्त्यावर 75 आणि दुसऱ्या रस्त्यावर 50 अपघाती मृत्यू झाले आहेत. येथील वाहतुकीची परिस्थिती हाताबाहेर गेले असून त्रस्त नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे भिवंडीतील वाहतूक समस्या तात्काळ सोडवा, अशी मागणी त्यांनी केली.
ड्रोनद्वारे भिवंडीतील वाहतूक समस्येबाबत सर्वेक्षण करा. येथील रस्त्यावर पुरेसे मार्शल ठेवा. कंत्राटदार काम करत नसतील तर दुसरे कंत्राटदार नेमा. रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा. खड्डे बुजवण्यासंदर्भात पोर्टल बनवा. येथील वाहतूक नियोजन करण्यासाठी स्वतंत्र एजन्सी नेमा आदी मागण्या यावेळी आमदार शेख यांनी या बैठकीत केल्या.
गेली दहा वर्षे भिवंडीतील वाहतुकीचा प्रश्न जैसे थे आहे. मागच्या आठवड्यात तीन व्यक्तींचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यामुळे भिवंडी शहराच्या वाहतूक शिस्तीच्या नियोजनासाठी मोबिलिटी प्लॅन अत्यंत गरजेचा आहे. भिवंडी शहराच्या विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करून त्यावर सक्षम अधिकारी नियुक्त करा, असे यावेळी आमदार शेख म्हणाले.
या बैठकीमध्ये आमदार शेख यांच्यासह खासदार सुरेश म्हात्रे, आमदार महेश चौगुले, आमदार शांताराम मोरे, माजी खासदार कपिल पाटील, ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक दिलीप स्वामी, वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट, निवासी उप जिल्हाधिकारी संदीप माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुधीर तांबे, तहसीलदार अभिजीत खोले, भिवंडी मनपा शहर अभियंता जमील पटेल, उप कार्यकारी अभियंता दत्तू गीते आदी उपस्थित होते.