Tagada
Tagada Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : साहेब, लोंढोली ते चिंचडोह या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण का नाही होत?

टेंडरनामा ब्युरो

चंद्रपूर (Chandrapur) : सावली तालुक्यातील लोंढोली पासून तीन कि.मी. अंतरावर आणि गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुका ठिकाणाहून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीवर, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाप्रमाणे चिंचडोह प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. मात्र या प्रकल्पाकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने प्रकल्पाकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूच्या मार्गाची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सदर प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील असला तरी वैनगंगा नदी ही चामोर्शी तालुका आणि सावली तालुक्यामधून वाहत असल्याने या तालुक्यातीलच नव्हे तर, चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक पर्यटकासाठी चिंचडोह प्रकल्प प्रेक्षणीय स्थळ बनले आहे. या स्थळाला पाहण्यासाठी अनेक ठिकाणाहून पर्यटक आणि शालेय विद्यार्थ्यांची सहल लोंढोली मार्गे येत असते.

एवढेच नव्हे तर व्याहाड बूज, सामदा, सोनापूर, कापसी, उपरी, पेठगाव, डोनाळा, कढोली, हरांबा, लोंढोली, साखरी, सिर्सी, जिबगाव, घोडेवाही, कोंडेखल, केरोडा, जांब, व्यहाड खुर्द, अशा परिसरातील 20 ते 30 गावातील नागरिक लांब मार्गाने चामोर्शीकडे जाण्यापेक्षा लोंढोली मार्गे चिंचडोह चामोर्शी असा कमी अंतराचा प्रवास करतात. जवळपासचे भाजी विक्रेत लोंढोली मार्गे चामोर्शी बाजारपेठला विक्रीसाठी नेत असल्याने या मार्गाने वर्दळ वाढली आहे. तेव्हा शासनाने चिंचडोह प्रकल्पाकडे जाणाऱ्या लॉढोली मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी केली जात आहे.