Rais Shaikh Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

कूपर आणि सायन रुग्णालयांत क्ष-किरण यंत्रांच्या खरेदीस दोन वर्षांचा विलंब?

अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा यांच्या भूमिकेची चौकशी करावी; चिनी कंपनीला एकच टेंडर मंजूर, तर जपानी कंपनीचे टेंडर रद्द केल्याचा आमदार रईस शेख यांचा आरोप

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कूपर आणि सायन रुग्णालयांसाठी क्ष-किरण यंत्रे खरेदी करण्याच्या प्रक्रियेला दोन वर्षांचा विलंब झाल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केला आहे. रोगनिदानासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांच्या अभावामुळे रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेकांना खासगी रुग्णालयांमध्ये महागड्या उपचारांचा आधार घ्यावा लागत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या विलंबाप्रकरणी अलीकडच्या काळापर्यंत आरोग्य आणि मध्यवर्ती खरेदी (सेंट्रल परचेस) या दोन्ही विभागांची जबाबदारी सांभाळणारे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणीही आमदार शेख यांनी केली आहे.

पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना लिहिलेल्या पत्रात आमदार रईस शेख यांनी म्हटले आहे की, या दोन यंत्रांची अंदाजित किंमत तीन कोटी रुपये होती. टेंडर प्रक्रियेत ‘कोनिका मिनॉल्टा’ या जपानी कंपनीने सहभाग घेतला होता. तत्कालीन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांच्या (पश्चिम उपनगरे) मंजुरीनंतर उघडण्यात आलेले या कंपनीचे दर अंदाजित किमतीपेक्षा १९ टक्के कमी होते.

हे टेंडर ‘डीएल’ प्रक्रियेसाठी पाठवण्यात आल्यानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी टेंडर रद्द करण्याचे निर्देश दिले. समर्थनीय कारण नसताना अत्यावश्यक दोन यंत्रांच्या खरेदीची प्रक्रिया रखडल्याचा आरोप आमदार शेख यांनी केला आहे.

एकाच निविदाकाराचा सहभाग असलेल्या अन्य एका खरेदी प्रक्रियेचा संदर्भ देत आमदार शेख यांनी टेंडर रद्द करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. अॅनेस्थेशिया वर्कस्टेशन्ससाठी चिनी कंपनी ‘माइंड्रे’ची एकमेव निविदा मंजूर करण्यात आली आणि त्याच काळात ‘डीएल’ प्रक्रियाही सुरू करण्यात आली. या दोन्ही प्रकरणांतील निर्णयांमध्ये विसंगती असल्याचा दावा करत, जपानी कंपनीला अन्यायकारकपणे लक्ष्य केल्याचे दिसून येत असल्याचे आमदार शेख यांनी पत्रात नमूद केले आहे.

सायन आणि कूपर रुग्णालयांमधील रेडिओलॉजी विभागाचे प्रमुख आणि अधिष्ठाता यांनी या यंत्रांची आवश्यकता अधोरेखित केली होती. आपत्कालीन व ट्रॉमा केसेस, बालरोग विभाग, शस्त्रक्रिया कक्ष आणि अतिदक्षता विभागासाठी ही यंत्रे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

रोगनिदानासाठी आवश्यक उपकरणांच्या अभावाचा रुग्णांवर परिणाम होत असून, उपचारासाठी विलंब आणि खासगी रुग्णालयांमध्ये अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आमदार शेख यांनी केला आहे. ही केवळ प्रशासकीय अकार्यक्षमता नसून मुंबईतील सार्वजनिक आरोग्यासाठी थेट धोका असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Key Points

  • कूपर आणि सायन रुग्णालयांसाठी क्ष-किरण यंत्रांच्या खरेदीला दोन वर्षांचा विलंब झाल्याचा आमदार रईस शेख यांचा आरोप

  • अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी

  • दोन क्ष-किरण यंत्रांची अंदाजित किंमत तीन कोटी रुपये

  • ‘कोनिका मिनॉल्टा’ कंपनीचे दर अंदाजित किमतीपेक्षा १९ टक्के कमी असल्याचा दावा

  • ‘डीएल’ प्रक्रियेसाठी पाठविल्यानंतर टेंडर रद्द करण्याचे निर्देश दिल्याचा आरोप

  • अॅनेस्थेशिया वर्कस्टेशन्ससाठी ‘माइंड्रे’ची एकमेव निविदा मंजूर केल्याचा आमदारांचा दावा

  • जपानी कंपनीच्या टेंडरबाबत अन्याय झाल्याचा आमदार शेख यांचा आरोप

  • सायन आणि कूपर रुग्णालयांतील रेडिओलॉजी विभागांकडून क्ष-किरण यंत्रांची गरज अधोरेखित

  • आपत्कालीन, ट्रॉमा, बालरोग, शस्त्रक्रिया आणि अतिदक्षता विभागांसाठी यंत्रांची आवश्यकता

  • उपकरणांच्या अभावामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असल्याचा दावा