Polluted Water Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : घनकचरा, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावा

टेंडरनामा ब्युरो

बोधेगाव (Bodhegaon) : बोधेगाव (जि. अहिल्यानगर) येथील काशी नदीच्या पात्रात गेल्या अनेक वर्षांपासून घनकचरा आणि सांडपाणी सोडत असल्याने नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.

याबरोबर घनकचरा पेटून देण्यात येत असल्याने हवेतही प्रदूषण वाढत आहे. प्रशासन कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याने काशी नदीचे कोणी प्रदूषण रोखणार का? असा सवाल ग्रामस्थांमधून केला जात आहे.

बोधेगावच्या दक्षिणेला काशी केदारेश्‍वर महादेवाचे प्राचीन मंदिर असून, याच डोंगर रांगेतून या नदीचा उगम होऊन, ती गोळेगाव, लाडजळगाव मार्गे बोधेगाव आणि नंतर हातगाव मुंगी येथे गोदावरी नदीला मिळते. एकबुरजी, पहिलवान बाबा आणि काळोबा वस्तीकडे जाणारा रस्ता आहे.

गावात दररोज एका घंटा गाडीच्या मदतीने प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जातो; परंतु यामध्ये ओला आणि सुका कचऱ्याचे कोणतेही नियम न पाळता तो तसाच नदीपात्रात टाकला जातो. धनकचऱ्याबरोबर कोणतीही प्रक्रिया न केलेले सांडपाणीही नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने नदीच्या पात्राचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. याबरोबर कोंबड्यांचे पंख, मांसाचे तुकड्यामुळे मोठ्या प्रमाणात श्‍वान जमा होतात.

नदीपात्रातील धनकऱ्याचे ढीग कमी करण्यासाठी त्याला पेटून देण्यात येत असल्याने शेवगाव-गेवराई राज्यमार्गावरील वाहतूक, एकबुरजी, काळोबा वस्तीवरून येणारे विद्यार्थी, स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी आलेले नागरिक, नदीलगतचे व्यापारी, तसेच दवाखाने आणि शेतकऱ्यांना या धुराचा त्रास सहन करावा लागतो.

बोधेगावचे सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनाचे टेंडर फ्लॅश झाले असून, ते फायनान्शिअल प्रोसेसला आहे. त्याचे टेंडर वेगवेगळ्या कंपन्याकडून भरण्यात आले असून, वर्क ऑर्डर झाल्यानंतर लवकरच हे काम एका कंपनीला देण्यात येणार आहे. यासाठी साधारण आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर या कामाला सुरुवात होईल.

- दादासाहेब गुंजाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग.

गेल्या दीड महिन्यापूर्वी आलेल्या कमिटीकडून जागेचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये ७२ लाखांमध्ये सांडपाणी आणि घनकचरा, तर २२ लाखांमध्ये प्लॉस्टिक व्यवस्थापनाचे बजेट आहे. हा प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- सरला घोरतळे, सरपंच, बोधेगाव