तगादा : टेंडर निघाले तरी पंढरपूर नगरपालिका प्रशासन ढिम्मच! 6 महिन्यांपासून...

Highmast Light
Highmast LightTendernama
Published on

पंढरपूर (Pandharpur) : पंढरपूर शहरालगतच्या वाखरी ते टाकळी बायपास या बाह्यवळण रस्त्याच्या दरम्यान पंत चौकामध्ये पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने हायमास्ट दिवा उभारण्यात आला आहे. मागील सहा महिने उलटून गेले तरी अद्यापही हा दिवा सुरू करण्यात आला नाही. पालिकेने तातडीने हायमास्ट दिवा सुरू करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

Highmast Light
Mumbai : 'केईएम' रुग्णालयात उभी राहतेय 21 मजली इमारत; 100 कोटींचे टेंडर 'त्या' कंपनीच्या खिशात

पंढरपूर- कराड रस्त्यावरील पंतनगरच्या पुढील पंत चौकामध्ये कोणतीही प्रकाशव्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी तिथे कायम अंधार असतो. या चौकामध्येच पंढरपूर ते कराड व वाखरी ते टाकळी हा बाह्यवळण रस्ता येऊन मिळत आहे. या बायपास रस्त्यावर अहोरात्र ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर व अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते.

मागील सहा महिन्यांपूर्वी या पंत चौकामध्ये पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने उंच असा हायमास्ट दिवा उभारण्यात आला आहे. मात्र, पुरेशा दाबाच्या वीज पुरवठ्याअभावी हा दिवा अद्यापही सुरू करण्यात आलेला नाही.

Highmast Light
Mumbai : 'त्या' 14 हजार कोटी खर्चाच्या प्रकल्पामुळे वेळेची 70 टक्के तर इंधनात 34 टक्के बचत

या परिसरात पहाटेच्या वेळी फिरायला येणाऱ्या शहरातील नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. याशिवाय आसपासच्या लक्ष्मी टाकळी, कोर्टी, गादेगाव, वाखरी या गावांतील शेतकरी, ग्रामस्थ व विद्यार्थी- विद्यार्थिनी यांची देखील या चौकामधून दिवसरात्र वर्दळ सुरू असते.

या चौकामध्ये कायमच अंधार असल्याने आतापर्यंत येथे छोटे- मोठे अपघात घडले आहेत. त्यामुळे पालिकेने तातडीने हा हायमास्ट दिवा सुरू करावा, अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

Highmast Light
CM फडणवीसांचा प्रशासकीय डीप क्लीन ड्राईव्ह; 'त्या' उपसचिवाची उचलबांगडी

आमची कोर्टी येथे शेती असून, आम्हाला दररोज पहाटेच्या अंधारामध्ये शहरातील मार्केट यार्डमधील लिलावामध्ये विक्रीसाठी डाळिंब, पेरू यासह भाजीपाला घेऊन जावा लागतो. मात्र पंत चौकामध्ये कोणतीही लाइट नसल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. तरी तातडीने हा दिवा सुरू करावा.

- बाळासाहेब हाके, शेतकरी, कोर्टी, ता. पंढरपूर

पंढरपूर शहरालगतच्या पंत चौकामध्ये उभारण्यात आलेला हायमास्ट दिवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला ६३ के.व्ही.चा ट्रान्सफॉर्मर उभारण्याची टेंडर मंजूर झाले आहे. पुढील दहा ते पंधरा दिवसांमध्ये हे काम पूर्ण करून हायमास्ट दिवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

- डॉ. प्रशांत जाधव, मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com