
पुणे (Pune) : दक्षिण उपनगरातील सातारा रस्त्यासह वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या स्वामी विवेकानंद मार्गावरील चेंबर व चेंबरची झाकणे व त्याचप्रमाणे अंतर्गत रस्त्यावरील चेंबर खचलेले असल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
अपघात टाळण्यासाठी काही सजग नागरिकांनी खचलेले चेंबर, झाकणे वाहन चालकांच्या निदर्शनास येईल अशा पद्धतीने बॅरिकेड, झाडाच्या फांद्या लावलेल्या आहेत.
स्वामी विवेकानंद मार्गावरील अण्णाभाऊ साठे पुतळा चौकातील यश लॉन्सकडे जाणाऱ्या वळणावरील रस्त्याचे चेंबर खचले असून त्यामध्ये वाहने अडखळून अपघात होत आहेत. त्याचप्रमाणे मुख्य रस्त्यावरील मधोमध असलेले चेंबरचे झाकण खचल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.
पोकळे वस्ती येथील समर्थनगरमधील मुख्य रस्त्यावरील पावसाळी चेंबर पूर्णपणे खचून त्याची लोखंडी जाळी गायब झाली आहे. त्यामुळे मोठा खड्डा तयार होऊन येथे अपघाताचा धोका निर्माण झालेले आहे. येथील रहिवाशांनी अनेक वेळा महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे. परंतु प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे येथे छोटे-मोठे अपघात सातत्याने घडतात.
मागील अनेक दिवसांपासून महापालिका प्रशासनाकडे रहिवाशांनी तक्रार केली असून प्रशासन दुर्लक्ष करत आहे. मोठा अपघात घडल्यानंतर प्रशासन चेंबरची दुरुस्ती करणार का असा प्रश्न पडत आहे.
- अतुल शेंडकर, रहिवासी, समर्थनगर
मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवरील चेंबर व झाकणे खचलेली असून अपघात होत आहेत. मोठा अपघात घडल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे का?
- शैला जगताप, स्थानिक रहिवासी
खचलेले चेंबर व झाकणे यांची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करण्यात येईल.
- प्रदीप आव्हाड, सहाय्यक आयुक्त, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय