छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहराच्या जुन्या भागातील किलेअर्क परिसरातील पालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या म्युनिसिपल काॅलनीला व याच काॅलनीला लागून असलेल्या देवडी बाजार, रोहिलागड काॅलनी, नौबत दरवाजा परिसरातील अनेक घरांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून तसेच ऐन सणासुदीच्या काळात नळाला ड्रेनेज युक्त पाणी येत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात महापालिकेकडे वारंवार तक्रार करुन देखील हा प्रश्न सोडवला जात नसल्यामुळे दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.
शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र आहे. जायकवाडी धरणातून शहराला पाणी पुरवठा केला जातो. हे धरण दुष्काळात अपूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची कुजलेली अवस्था झाली आहे. तकलादू पाण्याच्या जुनाट टाक्या कोसळण्याची शक्यता असल्याने त्या पूर्ण क्षमतेने भरल्या जात नाहीत. परिणामी दिवाळी पूर्वी तीन दिवसाआड पाणी ही घोषणा कागदावरच राहिली.ऐन सणासुदीच्या काळात शहरात आठव्या ते दहाव्या दिवशी पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी साठवून ठेवावे लागले. आठवड्यातून तर कधी दहा दिवसांत एकदाच पाणी पुरवठा होत असल्यामुळे महापालिकेने किमान शुध्द पाण्याचा पुरवठा करावा अशी नागरिकांनी अपेक्षा आहे, पण किंलेअर्क भागातील नागरिकांनी ही अपेक्षा पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे.
उपरोक्त भागातील अनेक घरांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून दूषित पाणी पुरवठा होत, त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना दुरुस्तीसाठी वेळ मिळत नसल्यामुळे नागरिकांना नळ कनेक्शन चार्ज देउन पिण्याचे व दररोजच्या वापरासाठी आवश्यक असलेलं पाणी कुठून आणावे असा प्रश्न समोर निर्माण झाला आहे. अनेक महिन्यांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याची या भागातील नागरिकांची तक्रार आहे. अधिकारी दुरुस्तीची कामे हाती घेतल्याचे म्हणून हातावर तुरी देऊन पसार होत आहेत. जर दुरुस्तीची कामे केली जात आहेत. मग पुन्हा दूषित पाण्याचा प्रश्न का निर्माण होत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेने खरेच दुरुस्तीचे काम केले की, दिखावा केला अशी चर्चा आता किलेअर्क या भागात सुरु झाली आहे. नळांना ड्रेनेजयुक्त पाणी येत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एकीकडे दुष्काळाचं संकट असताना दुसरीकडे दूषित पाण्याचे संकट देखील निर्माण झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. महापालिकेच्या यंत्रणेने याची दखल घ्यावी व कायमस्वरुपी दुरुस्तीचे काम करावे अशी मागणी होत आहे.