
पुणे (Pune) : धायरीतील बारंगणी मळा येथील चव्हाणबाग ते सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा येथील १२०० मीटर अंतराच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू झाले असून, त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या रस्त्याचे अनेक वर्षांपासून डांबरीकरण झाले नव्हते. त्यामुळे जागोजागी रस्त्यांवर खड्डे पडले होते, तर काही ठिकाणी खडी वर आल्याने वाहनधारकांना मार्गक्रमण करणे जिकिरीचे झाले होते. या सर्व गोष्टींची दखल घेत महापालिकेच्या पथ विभागाने एक कोटी रुपयांची तरतूद करून रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात केली आहे.
पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता संदेश पाटील यांनी सांगितले की, सिंहगड रस्त्याकडून डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. काम सुरू करताना प्रथम ज्या ठिकाणी जुना रस्ता चांगल्या अवस्थेत आहे, त्या ठिकाणी फक्त पुन्हा डांबरीकरण करण्यात येणार आहे.
तसेच काही ठिकाणच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने रस्ता खराब झालेला आहे, तिथे डांबरीकरण करण्यापूर्वी खोदाई करून नवीन रस्ता करून डांबरीकरण केले जाईल. रस्त्याच्या मधोमध असणारी भूमिगत गटार वाहिनीचे चेंबर डांबरीकरणाच्या समपातळीत करण्यात येणार आहेत.
धायरीतील बारंगणी मळा रस्त्यावर छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. तसेच याठिकाणी नव्याने रहिवासी बांधकाम प्रकल्प सुरू असल्याने वाहतूक जास्त आहे.
सिंहगड रस्त्याला जाण्यासाठी पर्यायी मार्ग असल्याने धायरीतील काही नागरिक धायरी फाट्यावर असणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
चव्हाणनगर ते नांदेड फाटा रस्त्याला एक कोटी रुपयांची रस्ता दुरुस्तीसाठी तरतूद केली आहे. त्यानुसार या रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण केले जाणार आहे.
- संदेश पाटील, कनिष्ठ अभियंता, पथ विभाग